पावसामुळे पुण्यातील फटाका विक्रीत कमालीची घट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 06:31 PM2019-10-27T18:31:01+5:302019-10-27T18:53:10+5:30
पुण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे फटाक्यांच्या विक्रीत घट झाली आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पुण्यातील फटका विक्रीत कमालीची घट झाली आहे. नेहमीपेक्षा पन्नास टक्के घट फटाक्यांच्या विक्रीत झाली आहे. तर दुसरीकडे माेठ्या आवाजाच्या फटक्यांचे उत्पादनही यंदा कमी करण्यात आले आहे. त्यामुळे शाेभेच्या फटाक्यांकडेच नागरिकांचा कल आहे.
दिवाळीत देखील पुण्यावर पावसाचे सावट असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला हाेता. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाच्या हलक्या सरी काेसळत आहे. दिवाळी सुरु झाली असली तरी पाऊस पडत असल्याने नागरिकांनी फटका खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे. त्याच बराेबर फटाक्यांच्या धुरामुळे हाेणारे वायू प्रदूषण तसेच त्यांच्या आवाजामुळे पक्षी आणि प्राण्यांवर हाेणाऱ्या परिणामामुळे नागरिकांमध्ये देखील जागृती हाेत चालली आहे. त्यामुळे देखील नागरिकांनी फटाका खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
याबाबत बाेलताना फटाका विक्रेते शाम परदेशी म्हणाले, यंदा पुण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे व्यावसायावर चांगलाच फरक पडला आहे. नेहमीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांनी फटाक्यांची विक्री घटली आहे. पावसामुळे लाेक फटाके घेण्यास आले नाहीत. परंतु आज आणि काल पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने आता हळूहळू नागरिकांची फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत आहे. यंदा माेठ्या आवाजाच्या फटाक्यांपेक्षा शाेभेच्या फटाक्यांना जास्त मागणी आहे.