राजकीय आकसापोटी पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटी कारवाई; उदय सामंत हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 09:11 AM2022-08-05T09:11:42+5:302022-08-05T09:11:49+5:30
आमदार उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात शिवसेनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक विशाल धनावडे, शहर प्रमुख गजानन थरकुडे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा निर्णय दिला आहे.
आमदार उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात विशाल धनावडे व गजानन थरकुडे यांची नावे घेण्यात आली होती. ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत दोघांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. घडलेल्या प्रकाराची कोणतीही शहानिशा न करता चुकीची कलमे लावून, केवळ राजकीय आकसापोटी शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांवर खोटी व चुकीची कारवाई केली आहे. गुन्हा घडला त्यावेळी हे पदाधिकारी घटनास्थळी नसतानाही त्यांना या गुन्ह्यात गुंतविले जात आहे, असा युक्तिवाद ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात मांडला. हा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने दोघांना ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तपासात सहकार्य करून साक्षीदारांवर दबाव न टाकण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.