'इंदापूर नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षणाचा खोटा पुरस्कार', झळकलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:11 IST2021-11-24T16:08:41+5:302021-11-24T16:11:19+5:30
स्वच्छतेचा खोटा पुरस्कार मिळाला या आशयाचे बॅनर लावून इंदापूर शहरात साचलेले कचर्याचे ढीग, अस्वच्छतेचे फोटो पुरावे, बॅनरवर छापल्याने दोन्ही बॅनरची चर्चा संपूर्ण इंदापूर शहरात रंगली आहे.

'इंदापूर नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षणाचा खोटा पुरस्कार', झळकलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा
बाभुळगाव : इंदापूर नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत देशपातळीवर सलग चौथ्यांदा जाहिर झालेला पुरस्कार स्वीकारल्यानंतर नगरपरिषदेचे अभिनंदन करणारे बॅनर इंदापूर शहरात चौकाचौकात झळकले. परंतु अज्ञात व्यक्तिने त्या बॅनर शेजारी, सध्याची परास्थिती पाहता इंदापूर शहराला स्वच्छतेचा खोटा पुरस्कार मिळाला. अशा आशयाचे बॅनर लावून इंदापूर शहरात साचलेले कचर्याचे ढीग, अस्वच्छतेचे फोटो पुरावे, बॅनरवर छापल्याने दोन्ही बॅनरची चर्चा संपूर्ण इंदापूर शहरात रंगली आहे.
नगरपरिषदेला मिळालेला पुरस्कार हा इंदापूर तालुका व शहराच्या दृष्टिने अभिमानाचीच गोष्ट आहे. परंतु इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सत्ताधारी गटनेता, विरोधी पक्षनेता, विरोधीपक्ष गटनेता, आरोग्य सभापती, आरोग्य अधिकारी किंवा विरोधी नगरसेवक यांना मान देऊन अभिमानाने पुरस्कार स्वीकारणे गरजेचे होते. परंतु मुख्याधिकारी यांना मनमानी कारभार नडला व याबाबत सत्ताधारी व विरोधकांना कानाची खबर न देता एका नगरसेवकासोबत दिल्लीत जाऊन तो पुरस्कार गुपचुपपणे स्विकारण्याचे कारण काय? याबाबची चर्चा इंदापूर शहरात दबक्या आवाजात सुरू झाली.
एकूणच इंदापूर शहरात लागलेल्या शुभेच्छा बॅनर शेजारी नगरपरिषदेचे कामकाज व विकासाचे वाभाडे काढणारे व पुरस्कार खोटा मिळाल्याचे बॅनर लावले आहे. हे बॅनर कोणी लावले? याचा शोध भविष्यात नगरपरिषद घेणार का? ही घटना घडून चार दिवस उलटले तरी नगरपरिषद सत्ताधार्यांकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. त्यामुळे नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहे. परंतु खर्या अर्थाने शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत शहराची पाहणी केल्यास शहराच्या आनेक भागात अस्वच्छता व कचर्यांचे मोठे ढीग आजही आपल्या निदर्शनास येत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेला देशपातळीवरचा चौथा पुरस्कार मिळालाच कसा हा प्रश्न सर्वांनाच पडल्याशिवाय राहणार नाही.