‘बालगंधर्व’बाबत विरोधकांचा दावा खोटा- मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 03:51 AM2018-12-09T03:51:47+5:302018-12-09T03:53:10+5:30
तज्ज्ञांच्या समितीबरोबर सल्लामसलत करूनच निर्णय घेतला जाईल. असे स्पष्ट असतानाही मेट्रोसाठी बालगंधर्व पाडले जात आहे हा विरोधकांचा दावा खोटा असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
पुणे : बालगंधर्व रंगमंदिराबाबत महापालिकेने पाडून विकास करणे किंवा आहे तसेच ठेवून सुधारणा करणे असे दोन प्रकारचे आराखडे मागवले आहेत. त्यावर तज्ज्ञांच्या समितीबरोबर सल्लामसलत करूनच निर्णय घेतला जाईल. असे स्पष्ट असतानाही मेट्रोसाठी बालगंधर्व पाडले जात आहे हा विरोधकांचा दावा खोटा असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. त्यांनीच समितीचे अध्यक्ष असताना सन २०१८-१९च्या अंदाजपत्रकात बालगंधर्वच्या नूतनीकरणासाठी आर्थिक तरतूद केली आहे.
पुण्यातील या महत्त्वाच्या वास्तूमध्येही विरोधक राजकारण पाहत आहे ही खेदाची गोष्ट आहे, असे नमूद करून मोहोळ म्हणाले, महापालिका आयुक्तांच्या जाहीर प्रकटनात जी गोष्ट उघड आहे ती लपवून ठेवून विरोधक बोलत आहेत. बालगंधर्व रंगमंदिर हा पुण्याचा सांस्कृतिक वारसा आहे. मात्र आता इतक्या वर्षांनंतर त्यात काही काम करणे आवश्यक आहे. त्यासाठीच दोन्ही प्रकारचे आराखडे मागवण्यात आले आहेत. त्यावर निर्णय घेण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येईल. त्यात अर्थातच ज्येष्ठ नाट्यकर्मींचाही समावेश असेल. ही समितीच याबाबतचा अंतिम निर्णय घेईल.
मेट्रोसाठी म्हणून बालगंधर्व पाडण्याचा प्रश्नच येत नाही, मात्र तरीही विरोधक तसा दावा करीत आहेत याचे कारण मेट्रोचे काम वेगात सुरू आहे याची त्यांना राजकीय भीती बसली आहे. निवडणुकीत मेट्रोचे काम आपल्याला अडचणीचे ठरणार याची खात्री वाटत असल्याने हे काम त्यांना थांबवायचे आहे. त्यासाठीच बालगंधर्व रंगमंदिर व मेट्रोची सांगड घालण्यात येत असल्याची टीका मोहोळ यांनी केली.