चित्रीकरण अर्धवट बंद करण्याची नामुष्की
By admin | Published: July 2, 2017 02:33 AM2017-07-02T02:33:25+5:302017-07-02T02:33:25+5:30
खडकीच्या रेंजहिल्स भागात शुक्रवारी चित्रपट अभिनेत्री तब्बूच्या एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. रहदारीच्या भागात कॅन्टोन्मेंट बोर्डाची पूर्व परवानगी न घेता
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : खडकीच्या रेंजहिल्स भागात शुक्रवारी चित्रपट अभिनेत्री तब्बूच्या एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. रहदारीच्या भागात कॅन्टोन्मेंट बोर्डाची पूर्व परवानगी न घेता चित्रीकरण सुरू केल्याने कॅन्टोन्मेट बोर्डाने आक्षेप घेतला. त्यामुळे चित्रीकरण थांबवावे लागले. या भागात सुमारे तीन तास वाहतूक खोळंबा झाला.
चित्रपट अभिनेत्री तब्बू हिच्या ‘पियानो प्लेअर’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण खडकीच्या रेंजहिल्स भागात सुरू होते. सकाळी सहा वाजता खडकी रेल्वे स्थानकाजवळ चित्रीकरणाची तयारी सुरू झाली. तब्बू, राधिका आपटे आणि आयुष्मान खुराणा यांचा चित्रीकरणात सहभाग होता. चित्रीकरणासाठी अंडरपासमार्गे वाहतूक बंद करण्यात आली. सकाळची कार्यालयीन कामकाजाची वेळ असल्यामुळे या मार्गावर वर्दळ वाढू लागली होती. बघ्यांचीही गर्दी झाली होती.
वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालकांना वेळेत कार्यालय गाठण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. मात्र, पर्यायी मार्गावरही वर्दळ वाढल्याने नागरिक आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा
लागला.
नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्रास होत असल्याने नागरिकांनी तक्रार केली. त्याची दखल घेऊन चित्रीकरण थांबविण्यात आले. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली.
परवानगीचा अभाव : प्रशासनाकडून कारवाई
स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर चित्रीकरण थांबविण्यात आले. त्यामुळे अभिनेत्री तब्बूला चित्रीकरण अर्धवट सोडून तिथून परतावे लागले. वाहतूक पोलिसांची पूर्व परवानगी घेऊन चित्रीकरण सुरू केले असल्याचा दावा निर्मात्याच्या वतीने करण्यात आला. मात्र, वाहतूक शाखेची परवानगी असली तरी कॅन्टोन्मेंट बोर्डाची पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याने चित्रीकरण थांबविणे भाग पडले.