देशभक्तीच्या नावाखाली खोट्या राष्ट्रवादाला खतपाणी : एन.राम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:33 AM2019-08-21T11:33:51+5:302019-08-21T11:35:08+5:30
हिंदू राष्ट्र उभारणीचा सिद्धांत समान हक्क, वागणूक व न्याय या मुलभूत तत्वांना धूर्तपणे नाकारतो.
पुणे : भारत हे हिंदू राष्ट्र असून, हिंदुत्व हीच तिची ओळख असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय नागरिकत्वाच्या व संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेवर घाला घालत आहे. हा हिंदू राष्ट्र उभारणीचा सिद्धांत समान हक्क, वागणूक व न्याय या मुलभूत तत्वांना धूर्तपणे नाकारतो. यासाठी मुस्लिमांविरोधात गरळ ओकणे व पद्धतशीरपणे सोईच्या धर्मनिरपेक्षतेचा प्रसार करण्याचे मार्ग अवलंबले जात आहेत. भारतीय संस्कृतीला व सर्व भारतीयांना हिंदू करून हिंदुत्वाला वैधता बहाल केली जात आहे, अशा शब्दातं ' द हिंदू ग्रृप' चे संचालक एन.राम यांनी संघाच्या हिंदुत्व विचारसरणीवर कडाडून टीका केली. हुकुमशाहीला बळ देणारे राष्ट्रीय ऐक्य व देशभक्ती यांचा वापर करीत खोट्या राष्ट्रवादाला व जातीयवादाला खतपाणी घातले जात असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शाखेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त डॉ. एन.राम यांचे वर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने (जनसमूहाच्या वंचिततेचे वास्तव, धर्मनिरपेक्षतेवरील हल्ला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने) याविषयावर डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळीडॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या प्रश्न तुमचा आणि उत्तर दाभोलकरांचे आणि ठरलं डोळस व्हायचं या दोन पुस्तकांच्या हिंदी अनुवादांचे लोकार्पण तसेच विवेकाचा आवाज या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहा भाषणांचे शब्दांकन केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार तसेच अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, डॉ. शैला दाभोलकर, नंदिनी जाधव उपस्थित होते.
हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांच्याच इतर काही अतिरेकी समविचारी संघटनेच्या पाठिंब्यामुळे या पक्षाला न भूतो न भविष्यती असे बहुमत मिळाले. त्यामुळेच आत्तापर्यंतच्या स्वातंत्र्याबददलच्या अंगळवणी पडलेल्या विचारसरणीला छेद देऊन सामाजिक-राजकीय कार्यक्रमांसाठी एक नवीन विचारसरणी घेऊन सत्ताधारी पक्ष मैदानात उतरला आहे, असे सांगून एन.राम पुढे म्हणाले, सर्वांना समान तत्वावर वागवणारी धर्मनिरपेक्षता न्याय या मूल्यावर आधारल्याशिवाय तिचा उत्कर्ष साधता येणार नाही. सोईच्या धर्मनिरपेक्षतेच्या रणनीतीचा वापर करून राजकीय संघटन करण्यासाठी फसव्या राष्ट्रवादाचा बुरखा पांघरून अशा संघटनांना लोकमान्य करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आपल्यातील उपजत असलेल्या वैज्ञानिक जाणिवा व विवेकवादाशिवाय जातीयवाद, धार्मिक मूलतत्ववाद, धर्मांधता व अतिरेकीपणा यांच्या विरोधातील लढा यशस्वी होणार नाही.
हेमंत गोखले म्हणाले, जे कुणी सरकारविरोधात बोलते त्यांना अडवले जाते ही गोष्ट देशासाठी नक्कीच भूषणावह नाही. ब्रिटीशांच्या काळात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे कारागृहात ठेवण्यात आले होते. तिचं परिस्थिती उदभवेल की काय? अशी भीती वाटू लागली आहे. पहलू खान प्रकरणात जसे मारेकरी सुटले तसे डॉ. दाभोलकरांच्या केसमध्ये होऊ नये.
----------------------------------------------------------
भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या दडपणाखाली आज भारतात प्रसारमाध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच दडपणाखाली आहे. यातून सामान्य नागरिकही सुटू शकलेले नाहीत. साधी फेसबुक पोस्ट करणा-या नागरिकांनाही अटक केली जाते. एकेकाळी राज्य असणा-या जम्मू आणि काश्मिरातील सर्व जनतेला एका मोठ्या कालखंडासाठी माहितीपासून दूर ठेवले गेले. त्यांचे इंटरनेट बंद केले. हे कलम 19 चे उघड उघड उल्लंघन होते. इतके मोठे पाऊल उचलण्याबाबत सरकारने कोणतेही स्पष्टीकरण देणे आवश्यक समजले नाही अशी टीकाही एन. राम यांनी केली.