खोटारडेपणा सोपा; शिवचरित्रातील सत्यकथनासाठी हवा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:18 AM2021-02-21T04:18:09+5:302021-02-21T04:18:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे अलीकडे उभे केले जाणारे चित्र दिवसेंदिवस अधिकाधिक विपरीत होत आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे अलीकडे उभे केले जाणारे चित्र दिवसेंदिवस अधिकाधिक विपरीत होत आहे. या नव्या मांडणीतल्या खोटेपणाचा प्रतिवाद करतानाच साधार आणि अभ्यासपूर्ण मांडणी करता यावी, या हेतूने चौदाशे पानी ग्रंथाचे लेखन करत असल्याचे ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी सांगितले.
सातव्या शतकानंतर भारतात येत गेलेल्या परकीय राजवटी, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात निर्माण केलेले स्वराज्य, तत्कालीन राज्यकर्त्यांची धार्मिक धोरणे हा या ग्रंथाचा गाभा आहे. या नव्या ग्रंथाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने मेहेंदळे यांच्याशी संवाद साधला.
* सध्याच्या काळात इतिहासाची हवी तशी मोडतोड केली जाते. त्याचा प्रतिवाद कसा करता येईल?
- शिवाजी महाराजांच्या सैैन्यात अमूक धर्माचे तमूक सैनिक होते, असे मी खूप दिवसांपासून ऐकत आलो आहे. ही संख्या ७० टक्क्यांपर्यंत होती, हे ऐकून मी अवाकच झालो. म्हणूनच मी शिवाजी महाराजांच्या हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती सेवकांची यादी म्हणून एक ६० पानांचे परिशिष्ट लिहिले आहे. त्यात मी प्रत्येक नावाचा साधार उल्लेख केला आहे. सेवकांची धर्मनिहाय संख्या टक्केवारीनुसार दिली आहे. वस्तुस्थितीचा, संदर्भांचा अभ्यास न करता अवाच्या सवा प्रमाण सांगितले जाते, ते खोटे आहे. मी कोणतीही मांडणी करताना आधार, संदर्भ देतो. त्यामुळे मी बरोबर सांगतो आहे ना, हे वाचकांना तपासून पाहता येते.
परवाच एका गृहस्थांनी मला शिवनेरी किल्ल्यावरील एक पाटीचा फोटो काढून पाठवला. त्यात ‘सिद्धी इब्राहीम खान, तोफखाना प्रमुख’ असे लिहिले आहे. एकतर ‘सिद्धी’ हा उल्लेख चुकीचा आहे. शिवाजी महाराजांच्या काळात तोफखाना प्रमुख हे पदच नव्हते. त्याखाली शिवाजी महाराजांच्या तीन अंगरक्षकांपैैकी एक असे लिहिले आहे. शिवभारतात दहा अंगरक्षकांची नावे सांगितली आहेत. दररोज नवनवीन खोटे सांगायचे, आधाराशिवाय सांगायचे, असे सातत्याने सुरू आहे. त्याचे उत्तर दिले पाहिजे, म्हणून मी लिहितो. खोटे बोलणे फार सोपे असते. महाराजांच्या सैैन्यात अमूक टक्के या धर्माचे होते, हे सांगायला लोकांना एक वाक्य पुरले. ते चुकीचे आहे, हे सांगायला मला ६० पानांचे परिशिष्ट लिहावे लागले, याद्या द्याव्या लागल्या. प्रत्येक खोटेपणाचा सतत प्रतिकार करत राहणे शक्य नसते. खरे सांगत राहणे, एवढेच आपण करू शकतो.
* इतिहासातील संदर्भ देताना कशा पद्धतीने संशोधन करावे लागते?
-हिंदू-मुस्लिम प्रश्नांवर कायम वाद होतो. शिवाजी महाराजांच्या काळातील किंवा त्याआधीच्या राजवटींचे इतिहासकार आणि राज्यकर्ते इस्लामचा बादशहा, इस्लामचे लष्कर असे उल्लेख करतात. म्हणून मी त्यांना ‘इस्लामी’ किंवा ‘मुसलमानी’ राजवटी म्हणतो. बादशहा मुसलमान होता, म्हणून त्यांना ‘मुसलमानी राजवटी’ म्हणतो, असे नाही. या राजवटींनी अनेक प्रकारचे अत्याचार केले. अत्याचार हा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे.* शिवाजी महाराजांमुळे हे अत्याचार थांबले, हे शिवचरित्राचे सर्वात महत्त्वाचे अंत:स्वरूप आहे.* शिवचरित्र म्हणजे केवळ चित्तथरारक, रोमांचकारी गोष्ट नाही. इतिहासाचा प्रवाह कोणत्या दिशेने चालला होता आणि शिवाजी महाराजांमुळे त्यात काय बदल झाला, हे समजून घेणे आवश्यक आहे.*
* खरे शिवाजी कसे होते, ही मांडणी कशा पद्धतीने करता येऊ शकते?
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबईतील पहिल्या पुतळ्याचे अनावरण करताना २६ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या भाषणात असे उद्गार काढले होते, “छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर भारताचे काय झाले असते ते सर्व जगाला माहीत आहे. पाकिस्तानची सीमा शोधण्याकरिता फार लांब जावे लागले नसते. कदाचित ती तुमच्या माझ्या घरापर्यंत येऊन पोचली असती.” हेच सूत्र मी पुरावे देऊन सांगत आहे. अनेक इतिहासकार केवळ वकिली करण्याच्या उद्देशाने इतिहासातील काही उल्लेख अत्यंत सफाईदारपणे वगळतात. एखाद्या दुकानदाराने भेसळ केलेले धान्य विकले, तर तो गुन्हा ठरतो. अनुवाद करताना काही प्रसंग वगळायचे, मतप्रदर्शन करायचे, हे कशासाठी? हे वाड्:मयचौर्याचे उलटे प्रतिबिंब आहे. माझ्या धर्मातील काही गोष्टी माणुसकीला धरून नसतील तर त्या मला मान्य नाहीत, हे सांगायचे धाडस माझ्यात आहे. मात्र ‘आमच्या धर्मग्रंथात माणुसकीला सोडून काही असेल, तर आम्ही ते मान्य करणार नाही’, असे अन्य धर्मीय म्हणतील का?
* धार्मिक अस्मिता अत्यंत टोकदार झाल्या आहेत. आपण आधुनिकतेकडे जाण्याऐवजी मागेच चाललो आहोत. हे निराशावादी चित्र इतिहासाच्या मांडणीमुळे बदलेल की आणखी बिघडेल?
-चित्र आशावादी व्हावे, यासाठी आपण सतत प्रयत्न करायला हवेत. निराशा ही पराभवाची पहिली पायरी असते. त्यामुळे आपण खरे सांगत राहिले पाहिजे, लिहीत राहिले पाहिजे. खरे लिहीत राहायचे, एवढेच इतिहासकार करू शकतात. माझ्यासारखे अनेक जण असे प्रयत्न करत आहेत. महापुरुषांचे दैैवतीकरण केले जाऊ नये, हेही तितकेच खरे आहे. सामान्य माणसाला शिवाजी महाराज योग्य प्रकारे समजले आहेत. त्यांचा लढा कोणत्या राजवटींविरुद्ध होता आणि हिंदूंच्या रक्षणाचा तो एकमेव मार्ग होता, हे त्यांना चांगले कळते. फक्त तसे खुलेपणाने बोलण्याची पद्धत नाही.
चौैकट
खोटा इतिहास का शिकवायचा?
पाठ्यपुस्तकात धादांत खोटा इतिहास शिकवला जातो. एनसीईआरटीच्या बारावीच्या पाठ्यपुस्तकाबाबत एक पत्र इंटरनेटवर फिरत आहे. त्यात असे लिहिले आहे की, लढाईत जी देवळे पाडली जात, त्यांना नंतर दुरुस्तीसाठी अनुदान दिले जाई, असे शहाजहान आणि औरंगजेब यांच्या कारकिर्दीवरून आपल्याला दिसते. हे वाक्यच दिशाभूल करणारे आहे. यावर एका गृहस्थाने माहितीच्या अधिकारात या वाक्याबाबतचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर, वाक्याबाबत कोणताही तपशील उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले. चुकीचा इतिहास शिकवण्यापेक्षा हा विषयच शिक्षणातून काढून टाका. त्याऐवजी दुसरे काही शिकवा, असे गजानन मेहेंदळे म्हणाले.
चौकट
दादोजी गुरू नव्हते
‘दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते’, असे लिहिणारा मी कदाचित पहिलाच शिवचरित्रकार असेन. मात्र, दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल शिवाजी महाराजांना नितांत आदर होता, असे दर्शवणारी पत्रेही आहेत, असे गजानन मेहेंदळे म्हणाले. त्यांनी सांगितले की, मी कायम पुरावे देऊन लिहितो. त्यामुळे मला आजवर कोणी त्रास दिला नाही किंवा मला कधी भीतीही वाटली नाही. मी आता लिहीत असलेल्या पुस्तकाचा प्रतिवादही होईल, पण ते अवघड आहे. कारण, मूळ साधनांमध्ये, पत्रांमध्ये जे उल्लेख आहेत, तेच मी सांगितले आहे.
चौकट
सत्य लपवणे, असत्य सांगणे, मुळात नसलेला मजकूर अनुवादात घुसडणे, मुळातला विषयाला धरून असलेला मजकूर अनुवादातून गाळणे अशी खोटारडेपणाची शेकडो उदाहरणे नामवंत इतिहासकारांनी लिहिलेल्या तथाकथित इतिहासांमध्ये आढळतात. खोटेपणाच्या या साथीत पाठ्यपुस्तकेही बळी पडली आहेत आणि औरंगजेब व टिपू यांच्यासारख्या धर्मवेड्या सुलतानांचे उदात्तीकरण करण्याची चढाओढच काही लेखकांमध्ये लागली असल्याचे मेहेंदळे सांगतात. जे कोणी त्यांच्या या कंपूत सामील होणार नाहीत त्यांना ‘वसाहतवादी’, ‘धर्मांध’, ‘राष्ट्रवादी’, अशी शेलकी विशेषणे लावली जात असल्याचेही ते म्हणाले.