शहीद जवानांची कुटुंबे घेणार दत्तक ; प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 08:11 PM2019-03-03T20:11:38+5:302019-03-03T20:12:59+5:30
पुलवामातील दहशतवादी हल्ला, त्यानंतरचा हवाई हल्ला आणि भारत-पाकिस्तान तणाव याबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे. मात्र, जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे होणार हाल, याबाबत फारसे बोलले जात नाही. यातील गांभीर्य लक्षात घेऊन शहीद झालेल्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय अधिका-यांनी पुढाकार घेतला आहे.
पुणे : पुलवामातील दहशतवादी हल्ला, त्यानंतरचा हवाई हल्ला आणि भारत-पाकिस्तान तणाव याबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे. मात्र, जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे होणार हाल, याबाबत फारसे बोलले जात नाही. यातील गांभीर्य लक्षात घेऊन शहीद झालेल्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय अधिका-यांनी पुढाकार घेतला आहे. प्रशासकीय अधिका-यांकडूनही या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची यादी तयार करण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यविषयक, मुलांचे शाळा प्रवेश आणि शेतीविषयक प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या, त्यांचे दररोजच्या जगण्यातील प्रश्न जाणून घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ११५ शहीद जवानांच्या कुटुंबांचा मेळावा शुक्रवारी (८ मार्च) आयोजित करण्यात आला आहे. सुरज मांढरे यांनी यासंदर्भात सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांनीही या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रश्न जाणून घेत त्यांची जलदगतीने सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पालकत्वासंदर्भात माहिती देताना सुरज मांढरे म्हणाले, ‘सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून सैनिक देशासाठी लढत असतात. दहशतवादी हल्ला, सीमेवरील घुसघोरी, जवान शहीद झाल्याच्या घटना घडल्यावरच आपल्याला सैनिकांबद्दल प्रेम वाटू लागते. युध्दज्वर ओसरला की आपल्याला शहीद जवानांचा विसर पडतो. मात्र, त्यांच्या कुटुंबियांवर काय परिस्थिती ओढावते, याचा विचार केला जात नाही. यावर उपाय म्हणून त्यांच्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभी करावी या उद्देशातून काही सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. आम्ही काही अधिकारी स्वयंस्फूर्तीने शहीद जवानांची कुटुंबे दत्तक घेणार आहोत. वरिष्ठ अधिकारी या कुटुंबीयांचे पालक झाल्याने या प्रश्नांची सोडवणूक जलद गतीने होईल. शहीद जवानांच्या कुटुंबीयांपैकी यापैकी काहीजणांशी संपर्क साधला असता त्यांना या कल्पनेमुळे खूप समाधान वाटले.’