अंशत: बाधित कुटुंंबांची परवड सुरूच

By admin | Published: July 29, 2016 03:46 AM2016-07-29T03:46:46+5:302016-07-29T03:46:46+5:30

माळीण दुर्घटनाग्रस्त ठिकाणी कोणी राहातेय, असे सांगितले तर विश्वासच बसणार नाही ; पण रामचंद्र रामा झांजरे यांचे कुटुंब आजही तेथे राहात आहे. ‘‘आमची चार कुटुंबे आहेत.

The families of partially affected families continue | अंशत: बाधित कुटुंंबांची परवड सुरूच

अंशत: बाधित कुटुंंबांची परवड सुरूच

Next

- निलेश काण्णव, घोडेगाव

माळीण दुर्घटनाग्रस्त ठिकाणी कोणी राहातेय, असे सांगितले तर विश्वासच बसणार नाही ; पण रामचंद्र रामा झांजरे यांचे कुटुंब आजही तेथे राहात आहे. ‘‘आमची चार कुटुंबे आहेत. मात्र एकच शेड मिळाले, एवढा मोठा प्रपंच कुठे ठेवणार, म्हणून जुन्या गावात येऊन राहात आहोत. जादा शेड मिळाले असते तर येथे कशाला आलो असतो’’ अशी तक्रार त्यांनी मांडली. या दुर्घटनेतील अंशत: बाधित कुटुंबीयांची आजही परवड सुरूच आहे.
माळीण दुर्घटनेत ४४ कुटुंबे व त्यातील १५१ लोक दगावले. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत या शासकीय इमारती, तसेच १६ घरे व त्यातील लोक नशिबाने वाचले. मात्र, त्यांची घरे बाधित झाली. पूर्ण गाडल्या गेलेल्या घरांना शासनाकडून भरघोस मदत मिळाली, राहण्यासाठी शेड मिळाले. परंतु अंशत: बाधित झालेल्या कुटुंबांची मात्र परवड झाली. वाचलेल्या घरांनाही भविष्यात धोका पोहोचू शकतो म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरावर ‘हे घर धोकादायक असून, येथे राहू नये’ अशा नोटिसा लावल्या. त्यामुळे येथील कुटुंबांना दुसरा निवारा पाहावा लागला.
शासनाने माळीण फाट्यावर ४० तात्पुरती निवारा शेड बांधून दिली. यामध्ये प्रथम पूर्ण बाधित कुटुंबांना घरे देण्यात आली. नंतर काही अंशत: बाधित कुटुंंबांना शेड मिळाली. ती पण पुरेशी न मिळाल्याने आज या कुटुंबांना बाहेर इतरत्र राहून दिवस काढावे लागले.
तसेच त्या कुटुंबांची वाचलेली जनावरे ठेवण्यास कुठेच जागा मिळाली नाही. त्यामुळे या लोकांनी शेवटी याच वाचलेल्या घरांमध्ये ही जनावरे बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू ही कुटुंबेही येथे राहायला येऊ लागली आहेत.
यातील रामचंद्र रामा झांजरे, राजू रामचंद्र झांजरे, विलास रामचंद्र झांजरे, जालिंदर रामचंद्र झांजरे ही एकत्र चार कुटुंबे आहेत. पण त्यांना एकच शेड मिळाले व नवीन गावात घरही एकच मिळणार आहे. त्यामुळे त्यांना जुन्या गावात राहायला येण्यापासून पर्याय उरला नाही. आमच्यासारखे अजून एक कुटुंब येथे जनावरे लावतात व राहातात तसेच भरपूर कुटुंबे अजूनही बाहेर खोल्या घेऊन पाहुण्यांकडे राहात आहेत. तेही हळूहळू मूळ गावठाणात राहायला सुरुवात करणार आहेत, अशीही खंत रामचंद्र झांजरे यांनी व्यक्त केली.

प्रांत व तहसीलदार यांनी भेट घेऊन जुनी घरे उस्तारणार नाहीत. त्यामुळे तुम्ही येथे बिनधास्त राहा फक्त मोठा पाऊस झाला तर लगेच खाली या, असे सांगितले आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसात आम्ही सगळे मागे टाकून खाली राहायला गेलो होतो.
- रामचंद्र झांजरे, माळीण ग्रामस्थ

Web Title: The families of partially affected families continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.