अपघातग्रस्त कुटुंबियांना अखेर मिळाला न्याय : दोन प्रकरणात ५० लाखांवर भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 07:29 PM2019-07-13T19:29:51+5:302019-07-13T19:32:48+5:30
मोशी व खडी मशीन चौकात अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना लोक अदालती मध्ये न्याय मिळाला.
पुणे : अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन प्रकरणांमध्ये लोकअदालतमध्ये अखेर न्याय मिळाला. अपघाताच्या दोन्ही प्रकरणांतून त्यांना नुकसानभरपाई दिली आहे. यात एका प्रकरणात २५ लाख, तर, दुसऱ्या प्रकरणात २५ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.
पहिले प्रकरण अनिता शंकर पोतदार (वय ३३, रा. चाकण) यांनी अॅड. कांचन धामणकर यांच्याव्दारे ९ आॅक्टोबर २०१७ रोजी मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. अनिता यांचे पती शंकर गणेशराव पोतदार (वय ४३) हे १९ सप्टेंबर २०१७ रोजी नाशिक-पुणे रस्त्याने चाकणकडून भोसरीकडे दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी मोशी चौकात डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते एका कंपनीत कामाला होते. त्यांना दरमहा १७ हजार रुपये पगार होता. पत्नी, दोन मुले आणि आईचे पालकत्व त्यांच्याकडे होते. या पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या विरोधात दाखल केलेल्या दाव्यात ३० लाख रुपये नुकसानभरपाई मागितली होती. मात्र, २५ लाख रुपये नुकसानभरपाई देत तडजोडीअंती दावा निकाली काढला. विमा कंपनीच्या वतीने अॅड. हृषीकेश गानू यांनी काम पाहिले.
दुसरा दावा सुमित चंद्रकांत शिंदे (वय २६, येवलेवाडी) यांच्या मृत्यूप्रकरणी वडील चंद्रकांत आणि आई शैलजा यांनी अ?ॅड. कांचन धामणकर यांच्यामार्फत दाखल केला होता. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी खडीमशिन चौकात रस्त्याच्या कडेला सुमित उभे राहिले असताना त्यांना डंपरने धडक दिली. २३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांचा उपचाराद रम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ते सक्सेस इन्स्टिट्युट चालवत होते. तसेच नियमित आयकर भरत असत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बजाज अलायन्स कंपनीच्या विरोधात दाखल केलेल्या दाव्यात ३० लाख मागितले होते. लोकअदालतमध्ये २५ लाख ५० हजार रुपये देत हा दावा निकाली काढला.