कौटुंबिक वाद! कंट्रोल रूमला कॉल, पोलिसांची सतर्कता अन् एकाचा जीव वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 09:39 IST2025-03-06T09:36:44+5:302025-03-06T09:39:56+5:30
एकाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी दरवाजा तोडून त्या व्यक्तीला वाचवले

कौटुंबिक वाद! कंट्रोल रूमला कॉल, पोलिसांची सतर्कता अन् एकाचा जीव वाचला
हडपसर : हडपसर पोलीस स्टेशनच्या मार्शलने दाखविलेल्या सतर्कतेमुळे गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचा जीव वाचला आहे.
पोलीस कंट्रोल रूमला एका व्यक्तीने बहिणीत व तिच्या दिरामध्ये वाद चालू आहेत असा कॉल केला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस गोपाळपट्टी मांजरी येथे घटनास्थळी पोहोचताच, संबंधित महिलेने आपल्या दिराने आपल्याशी भांडण केले व रागाच्या भरात घराचा दरवाजा लावून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ घराचा दरवाजा धक्के देऊन तोडला. छतावरील फॅनला ओढणीच्या साह्याने नुकताच गळफास घेतलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ओढणी कापून पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवले. बेशुद्ध असलेली गळफास घेतलेली व्यक्ती रुग्णालयातील उपचारानंतर शुद्धीवर आली. व त्या व्यक्तीचे प्राण वाचले.
त्या फाशी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला या पोलिसांनी व त्याच्या नातेवाईकांनी सुरुवातीला खाजगी रुग्णालयात नंतर ससून रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांचे उपचार घेऊन ती व्यक्ती आता बरी झाली आहे व तिच्या घरी गेली आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे मार्शल विजय ढाकणे व राजेंद्र करंजकर यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे एका नागरिकाचे प्राण वाचले. पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचे समाजातून सर्व स्तरात कौतुक होत आहे.