अपघाताचा फोन खणाणला आणि दहा वर्षांनी कुटुंबियांना ‘दीपक’ मिळाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 04:57 PM2019-03-27T16:57:44+5:302019-03-27T17:06:59+5:30
पुण्यामध्ये आल्यानंतर दीपकने एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. त्यानंतर जेमतेम एक महिना त्याने कुंटुंबियासोबत दूरध्वनीवरुन संपर्क ठेवला. त्यानंतर कुटुंबियांशी संपर्क करणे त्याने बंद केले.
- प्रकाश गायकर-
पिंपरी : एक दिवस उत्तराखंडमधील पियोरागड जिल्ह्यातील किलगाव येथील जखमी झालेल्या दीपक चंदच्या घरी शेजारील गावच्या प्रमुखाचा फोन आला. फोनवर सांगण्यात आले की, तुमचा भाऊ दीपक याचा पुण्यामध्ये अपघात झाला आहे. दहा वर्षांपूर्वी अचानक गायब झालेल्या भावाचा अपघात झाल्याचे ऐकून भाऊ संदीप यांना काय बोलावे ते सुचेना. फोनवरच त्यांना रुग्णालयाचा पत्ता देण्यात आला. आपल्या दोन नातेवाईकांना घेऊन संदीप यांनी उत्तराखंडमधून पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय गाठले. भावाला जखमी अवस्थेमध्ये पाहून संदीप यांच्या भावनेचा बांध फुटला. भावाचा अपघात झाल्याने मनात दु :ख तर झालेच होते, मात्र अपघात झाला म्हणून भाऊ भेटला याचे समाधानही वाटत होते.
दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये दीपक रोजगाराच्या शोधात पुण्यामध्ये आला. पुण्यामध्ये आल्यानंतर त्याने एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. त्यानंतर जेमतेम एक महिना त्याने कुंटुंबियासोबत दूरध्वनीवरुन संपर्क ठेवला. त्यानंतर कुटुंबियांशी संपर्क करणे त्याने बंद केले. त्यानंतर भाऊ संदीप चंद यांने आपल्या जवळच्या नातेवाईकांना घेऊन पुण्यामध्ये भावाची शोधाशोध केली. शहरातील नामवंत कंपन्या, हॉटेल्स, सोसायट्या आणि परिसर पिंजून काढला. मात्र दीपकचा कुठेच शोध लागला नाही. काही दिवस शोधाशोध केल्यानंतर कुटुंबियांनी तो पुन्हा येण्याच्या सर्व आशा सोडून दिल्या.
पुनावळे येथे दीपकचा अपघात झाल्यानंतर त्याला वायसीएममध्ये दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर समजले की या तरुणाचे कोणीही नाही. रिअल लाईफ रिअल पिपलचे संस्थापक एम.ए.हुसैन यांनी त्या तरुणाची जबाबदारी स्वीकारली. जखमी अवस्थेत तरुणाकडे विचारपूस केल्यानंतर त्याने उत्तराखंड येथील त्याचा पत्ता सांगितला. फोन नंबर नसल्याने एम.ए.हुसैन यांनी जवळील गावच्या प्रमुखाला फोन करुन सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर कुटुंबियांपर्यंत दीपकच्या अपघाताची बातमी पोहचली. या कार्यामध्ये समाजसेवक महादेव बोत्रे, रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेचे कर्मचारी, रुग्णालयातील परिचारिका यांची साथ लाभली. अपघात झाल्यामुळे दहा वषार्पासून काहीही संपर्क नसलेल्या भावाचा शोध लागला. तर दहा वषार्पूर्वी अचानक सोडून गेलेला मुलगा पुन्हा मिळाला म्हणून आईच्या आशा पल्लवित झाल्या.
दीपकने घरच्यांसोबत संपर्क तोडला होता. खूप शोधूनही तो मिळाला नाही तेव्हा आम्ही सर्व आशा सोडून दिल्या होत्या. तो मृत झाला आहे असे समजून आम्ही त्याचा मृत्यूचा दाखला काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र त्याचा अपघात झाल्यानंतर रिअल लाईफ रिअल पिपल ही संस्था मदतीसाठी धावून आली. या संस्थेमुळे दहा वर्षांनी माझा भाऊ सापडला.
- संदीप चंद, भाऊ.