Pune: पुण्यात कुटुंबाचा चौकीतच राडा; पोलिसांच्या अंगावर धावत फाडली कागदपत्रे, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 03:43 PM2022-02-20T15:43:21+5:302022-02-20T15:44:01+5:30
पोलीस शिपायाच्या अंगावर धावून धक्का देत त्यांच्या हातातील कायदेशीर व गुन्ह्याच्या तपासाची गोपनीय कागदपत्र फाडून शासकीय कामात अडथळा आणला
पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणाच्या पोक्सोंतर्गत दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या कुटुंबाने वडगाव पोलीस चौकीत राडा घातला. आणि पोलिसांच्या अंगावर धावून गेले. तेथील तपासाची कागदपत्रे फाडून टाकली. स्वत:लाच मारहाण आणि शिवीगाळ करून ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रवींद्र संताराम उन्हाळे (वय ३२) आणि रामदास संताराम उन्हाळे (वय ३८, रा. वडगाव, धाबाडी) यांना अटक केली, तर पुनम रवींद्र उन्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वडगाव पोलीस चौकीत शनिवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीडच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांच्याकडे पोक्सोंतर्गत एका गुन्ह्याचा तपास आहे. त्या गुन्ह्यातील चौकशीसाठी त्यांनी उन्हाळे कुटुंबाला बोलावले होते. उन्हाळे हे भाजी विक्रेते आहेत. बोलावल्यानुसार हे तिघे चौकशीसाठी वडगाव पोलीस चौकीत आले होते. पोलीस शिपाई माळी त्यांच्याकडे चौकशी करीत होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला कशाला बोलावले. आमचा काही संबंध नाही, असे म्हणत चौकीत गोंधळ घातला. पोलीस शिपाई माळी यांच्या अंगावर धावून धक्का देत त्यांच्या हातातील कायदेशीर व गुन्ह्याच्या तपासाची गोपनीय कागदपत्र फाडून टेबलावरील कागदपत्र फेकून शासकीय कामात अडथळा आणला. त्यानंतर तिघेही स्वत:लाच मारहाण करू लागले. अर्वाच्च भाषेत बोलून, ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची व आंदोलनाची धमकी दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे अधिक तपास करीत आहेत.