लाखेवाडी हल्ल्यातील कुटुंबाचे शासन पुनर्वसन करणार

By admin | Published: June 29, 2015 11:47 PM2015-06-29T23:47:19+5:302015-06-29T23:47:19+5:30

‘लाखेवाडी दलित हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेस दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अन्यायग्रस्त

Family rehabilitation will be done in Lakhwadi attack | लाखेवाडी हल्ल्यातील कुटुंबाचे शासन पुनर्वसन करणार

लाखेवाडी हल्ल्यातील कुटुंबाचे शासन पुनर्वसन करणार

Next

इंदापूर : ‘‘लाखेवाडी दलित हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेस दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अन्यायग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक लाख
वीस हजार रुपये मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली
आहे. त्यापैकी प्रत्येकी चाळीस हजार रुपये येत्या एक-दोन दिवसांत मिळतील,’’ अशी माहिती समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज (दि. २९) येथे पत्रकार परिषदेत दिली.
अन्यायग्रस्त भिंगारदिवे कुटुंबास सामाजिक न्याय विभागाच्या वतीने घर बांधून देण्यात येईल. रहदारीसाठी डांबरी रस्ता तयार करून देण्यात येईल. पाणी, स्वच्छतागृहाचीही व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून दिलीप कांबळे म्हणाले, की भिंगारदिवे कुटुंबाकडे सहा एकर बागायत जमीन आहे. ती त्यांनी विकावी अथवा ती बळकावता यावी या दृष्टीने आरोपी त्यांच्यावर दबाव आणत होते. त्यातूनच हे हल्ला प्रकरण घडले आहे, असे आज भिंगारदिवे कुटुंबातील सदस्यांशी बोलताना आपल्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांची जमीन त्यांच्या मर्जीशिवाय किमान वीस वर्षे तरी विकली जाणार नाही, अशी व्यवस्था आपण केली आहे, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.
कांबळे म्हणाले, की पोलीस यंत्रणेकडून आपण तपासाची माहिती घेतली आहे. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. भा.दं.वि. कलम ३०७ लावण्यात आले आहे. प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत. मात्र गुंडवजा पैलवान असणारे व ज्यांनी अमानुष मारहाण केली ते २५ ते ३० जण अद्याप फरार आहेत.
सर्व आरोपींना अटक करावी. कसल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करावी, असे आदेश आपण पोलीस यंत्रणेस दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, असे कांबळे म्हणाले.

या घटनेमुळे आमच्या लाखेवाडी गावास हल्लेखोरांनी काळीमा फासला, अशी तेथील लोकांची प्रतिक्रिया आहे. मातंग समाजाची गावात केवळ दोनच घरे आहेत. एक तर मागासवर्गीयांकडे जमीनच नसते. ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर असे प्रसंग येतात, असे या वेळी बोलताना दिलीप कांबळे म्हणाले. दलित अत्याचाराबाबत अहमदनगरनंतर इंदापुरात असे चित्र निर्माण झाले आहे. भाजपाचे सरकार आल्यानंतर दलितांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का, या प्रश्नास उत्तर देताना, आपल्याला तसे वाटत नाही, असे कांबळे यांनी सांगितले. ते म्हणाले, की दलित अत्याचाराबाबत आमचे सरकार गंभीर आहे, अशी कृत्ये करणाऱ्या कुणालाही माफ केले जाणार नाही. कडक कारवाई करणार आहे, असेही त्यांनी संगितले. कुठल्याही दलित बांधवावर अन्याय झाला तर पहिल्यांदा रिपाइंच आवाज उठवते. त्यानंतर बाकीचे येतात. मग आमचे यामध्ये कुठे चुकते का, अशी विचारणा पत्रकार परिषदेत येऊन रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मखरे यांनी थेट दिलीप कांबळे यांना केली. त्या वेळी सर्वच जण अवाक झाले. यावर दिलीप कांबळे तत्काळ उत्तरले, की रिपाइंचे काहीच चुकत नाही. बसून चर्चा करू, असेही मखरे यांना सुचवले.

Web Title: Family rehabilitation will be done in Lakhwadi attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.