कोरोना योद्ध्यांच्या घरात आता 'कौटुंबिक युध्द'; महिला व बालक विभागाकडे ४० पेक्षा जास्त तक्रारीं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 02:10 PM2020-05-21T14:10:37+5:302020-05-21T14:12:57+5:30

गावची भांडणे सोडवताना घरातली भांडणे सोडवताना आता नाकीनऊ आला आहे.

family war at Corona Warriors' House, more than 40 complaints registred | कोरोना योद्ध्यांच्या घरात आता 'कौटुंबिक युध्द'; महिला व बालक विभागाकडे ४० पेक्षा जास्त तक्रारीं

कोरोना योद्ध्यांच्या घरात आता 'कौटुंबिक युध्द'; महिला व बालक विभागाकडे ४० पेक्षा जास्त तक्रारीं

Next
ठळक मुद्देमहिला व बाल कल्याण विभागाकडे 40 हून अधिक तक्रारी

युगंधर ताजणे - 
पुणे : जगाची काळजी वाहताना घरातील माणसे कोरोना योध्द्यांना टोमणे मारुन सतावत आहेत. सकाळी घरातून बाहेर पडल्यावर रात्री घरी येण्यास होणारा उशिर, लॉकडाऊन असताना घरात मुलांना वेळ न देणे, घरातल्या माणसांची काळजी न घेणे, घरकामात हातभार न लावणे, ज्येष्ठ व्यक्तींची काळजी न घेणे, यावरुन कोरोना योध्दा महिलांना आता घरातील व्यक्तींकडून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: पतीकडून मारले जाणारे टोमणे, केली जाणारी शिवीगाळ, मुलांच्या काळजीचे कारण पुढे करुन दिला जाणारा त्रास यामुळे त्या कोरोना योद्ध्यांच्या घरात कौंटुंबिक युध्दाला सुरुवात झाली आहे. यासंबंधी महिला व बालक विभागाकडे 40 पेक्षा जास्त तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. 
   शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. आता तो ग्रामीण भागात देखील पसरु लागला आहे. अशावेळी पुणे जिल्हयात ग्रामपंचायत स्तरावर महिला सुरक्षा दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हयातील या समितीत एकूण 21 हजार महिला सहभागी असून महिला सुरक्षा व दक्षता समितीत 1 हजार 455 महिला काम करत आहेत. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुजा पारगे यांच्या प्रोत्साहन आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे काम सुरु आहे. या समितीमध्ये ग्रामपंचायतीतील महिला सदस्या, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, आशा वर्कर, महिला ग्रामसंघ व महिला बचत गटातील अध्यक्ष, सचिव, सदस्य यांचा समावेश करण्यात आला आहे. 
   वेळेअभावी घरातील कामे करण्यास शक्य होत असल्याने पतीची चिडचिड होत आहे. ज्येष्ठ मंडळींना वेळेवर नाश्ता, जेवण हवे आहे. एकवेळ मुले समजुन घेतात. मात्र पती आणि सासु-सासरे आगपाखड करत असल्याची तक्रार दक्षता समितीतील महिलांनी केली आहे. पतीला लॉकडाऊन असताना  वर्क फ्रॉम ची सुविधा आहे. आम्हाला गावातील प्रत्येक घरात जाऊन तिथे माहिती आणि मार्गदर्शन करायचे आहे. त्या कामी लागणारा वेळ, कष्ट, घरातील माणसे लक्षात घ्यायला तयार नाहीत. अशी खंत महिला व्यक्त करतात. 

* घरातील जी छोटी कामे आहेत ती पुरुषमंडळी करु शकतात. मात्र त्याठिकाणी त्याचा  इगो आड येताना दिसतो. पती, सासु, सासरा या सगळयांना सांभाळुन घेताना त्या महिलेसाठी तारेवरची कसरत आहे. आठ तासांपेक्षा अधिक काम त्या करत आहेत. अशावेळी पतीने ठामपणे पत्नीला सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यात भांडणे होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. - रत्नप्रभा पोतदार (पर्यवेक्षिका, महिला व बालकल्याण विभाग, पुणे जिल्हा परिषद) 

*महिला सुरक्षा दक्षता समितीचे काम काय ? 
लॉकडाऊनच्या परिस्थितीत महिलांना कुठलाही कौटूंबिक त्रास होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवर समुपदेशन, गरज भासल्यास महिलांच्या सुरक्षेसाठी शासकीय यंत्रणाच्या मदतीसाठी मार्गदर्शन करणे, महिलांना कायदेशीर सल्ला देणे, तसेच जीवनावश्यक वस्तु मिळण्यासाठी समस्या येत असल्यास ती दूर करणे, गरोदर महिलांची विशेष काळजी व पोषण आहार याची माहिती देण्याचे काम या समितीकडे आहे. 

*घरचे काय ऐकायला तयार नाहीत...
  सध्याची परिस्थिती पाहता आहे त्यापेक्षा जास्त वेळ काम करावे लागत आहे. घरातील कामे करुन, पुन्हा ड्युटीवर हजर होणे, गावात जाऊन पाहणी करणे, लोकांना भेटणे, हे सोपे काम नाही. दोन महिन्यांपासून घरात बसून असणा-या पतीला हे सांगितल्यास त्याचा  इगो दुखावतो. वास्तविक घरातील अनेक कामे तो सहजरीत्या करु शकतो. त्यासाठी मुलांची मदत घेऊ शकतो. पण काही करायचेच नाही म्हटल्यावर कोण काय करणार ? गावाची भांडणे सोडवताना आमच्या घरातली भांडणे सोडवताना आता नाकीनऊ आल्याचे महिला दक्षता समितीत काम करणा-या एका महिलेने सांगितले.

Web Title: family war at Corona Warriors' House, more than 40 complaints registred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.