पंधरा वर्षात प्लास्टिक वगळता कचऱ्याचा कण घराबाहेर न टाकणारे कुटूंब
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 06:00 AM2020-02-20T06:00:00+5:302020-02-20T06:00:06+5:30
विशेष म्हणजे घरात त्यांनी आजपर्यंत टिव्हीही घेतलेला नाही...
निलेश राऊत -
पुणे : घर-अंगण स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडणारी कुटुंबे आपण नित्याने पाहतो. मात्र घरातील व घराच्या अंगणातील कचरा घराबाहेरच जाऊ न देता तो घरातच जिरवायचा आणि वापरायचा, हे ब्रीद घेतलेली माणसे दुर्मिळात दुर्मीळ आहेत. असेच एक कुटुंब पिंपळे निलखमध्ये वास्तव्यास आहे. या कुटुंबाने गेल्या पंधरा वर्षात प्लॅस्टिक वगळता कचऱ्याचा एकही कण घराबाहेर जाऊ दिलेला नाही नाही.
डॉ़साधना व डॉ़ पांडुरंग पाटील ही ती ‘झीरो वेस्ट फॅमिली.’ त्यांचे घर म्हणजे एक जंगलच असून अंगणाच्या कुंपणाला नारळाच्या झाडांच्या झावळ्या, झाडांच्या तुटलेल्या फांद्यांचे आच्छादन आहे. घराच्या दरवाज्यातच गप्पी माशांसाठी बांधलेली खुली टाकी, गच्चीत विविध झाडे हे त्यांचे वैभव आहे.
होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या साधना यांनी गेल्या वीस वर्षात पती पांडुरंग यांच्या सहकार्याने बंगल्याच्या गच्चीत मोठा मळा फुलविला आहे. गच्चीवर शेततळ्याकरीता वापरण्यात येणारे काळे ‘शिट’ आंथरून त्यावर मातीचा थर तोही घरातील कचऱ्यापासून तयार झालेल्या कंपोस्ट खतासह पसरला आहे. याठिकाणी आंबा, आवळा, लिंबू, सोनचाफा़, रातराणी या झाडांची घरापुरते उत्पादन देणारी बाग तयार केली आहे. याकरिता कुठलेही रासयनिक खत त्या वापरत नाहीत.
स्वयंपाक घरातील ओला व सुका कचरा (प्लॅस्टिक वगळून), बंगल्याच्या दीड गुंठे परिसरातील झाडांच्या फांद्या, नारळाच्या करवंट्या, वाळलेला पालापाचोळा आदीचे अंगणातच कंपोस्ट खत तयार करतात. घराच्या कुुंपणावर टाकलेल्या व कालांतराने वाळलेल्या झाडांच्या फांद्या तसेच नारळाच्या झावळ्यांचा वापर घरातील ‘बॉयलर’साठी केला जातो.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मूळ निवासी असलेले हे पाटील दांम्पत्य आपल्या ‘ झीरो वेस्ट फॅमिली ’ म्हणून जीवन जगत आहे. विशेष म्हणजे घरात त्यांनी आजपर्यंत टिव्हीही घेतलेला नाही. नित्य कामकाज झाल्यावर दोघेही आपला पूर्ण वेळ घर-अंगणातील निसर्ग पुजेला देतात.
----------------------------