तिच्या मृत्युनंतर कुटुंबाला तीन वर्षांनी मिळणार 62 लाख रूपये; समुपदेशनाद्वारे दावा निकाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 08:42 PM2021-03-05T20:42:29+5:302021-03-05T20:42:45+5:30
पतीने कारमालक आणि संबंधित विमा कंपनीच्याविरोधात दावा दाखल करत 80 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली...
पुणे - ’ती’चा 2015 मध्ये अपघात झाला. तब्बल तीन वर्षे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र 2018 मध्ये ‘ती’ हे जग कायमचे सोडून गेली. अपघातात मृत्यू झालेल्या या विवाहितेचा दावा केवळ समुपदेशनामुळे तीन वर्षांनी निकाली निघाला आहे. यामुळे तिच्या पतीला 62 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
स्नेहल गणेश धुमाळ असे मयत विवाहितेचे नाव आहे. ती एस.वाय.बी.कॉमला शिकत असताना शेजारी राहणाऱ्यांबरोबर अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघाली होती. त्यावेळी एका वळणावर कार पलटी झाली. 4 एप्रिल 2015 झालेल्या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली. सोलापूर येथील येथील एका रुग्णालयात उपचार देण्यात आले. त्यानंतर पुण्यातील जहांगीर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तीन वर्षे उपचार सुरू होता. त्यानंतर 23 मार्च 2018 मध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या उपचारासाठी 50 लाख रुपये खर्च आला.
पतीने कारमालक आणि संबंधित विमा कंपनीच्या विरोधात दावा दाखल करत 80 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली. जिल्हा न्यायाधीश एस.एन.सोनवणे यांनी समुपदेशानासाठी अँड. अतुल गुंजाळ यांच्याकडे हे प्रकरण पाठविले. अँड. गुंजाळ यांनी दोनदा समुपदेशन केल्यानंतर हे प्रकरण निकाली निघाले. अर्जदाराकडून ड. एस.जी. जोगवडीकर यांनी तर, विमा कंपनीच्या वतीने अँड. सुनील द्रविड यांनी काम पाहिले.
-------------------------------------------------------------------------------