प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 'ईडी'कडून कसून चौकशी; 'हे 'आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 01:46 PM2020-11-28T13:46:24+5:302020-11-28T13:59:39+5:30

भोसले यांची मुंबईत चौकशी सुरू असताना त्यांच्या पुण्यातील निवासस्थानीही ईडीच्या पथकाने छापा टाकला.

Famous builder Avinash Bhosale interrogated by 'ED'; 'This' is the case | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 'ईडी'कडून कसून चौकशी; 'हे 'आहे प्रकरण

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 'ईडी'कडून कसून चौकशी; 'हे 'आहे प्रकरण

googlenewsNext
ठळक मुद्देकारवाई बेकायदा विदेशी चलन व महागड्या वस्तू बाळगल्याचे प्रकरण; यापूर्वीही झाली आहे कारवाई  

 पुणे : अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांसोबत निकटचे संबंध असलेले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून ('ईडी') शुक्रवारी कसून चौकशी झाली. ईडीच्या पथकाने भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयावर छापा टाकल्याचे समजते, मात्र यास दुजोरा मिळू शकला नाही. 

ईडीच्या परिमंडळ दोनच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भोसले यांना मुंबईतील बलार्ड पियर येथे असणाऱ्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावून घेतले होते. सकाळी दहा वाजता त्यांची आलिशान गाडी ईडी कार्यालयात आल्याची बातमी राजकीय क्षेत्रात वेगाने पसरली. रात्री आठ वाजेपर्यंत भोसले ईडीच्या कार्यालयात होते.त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. भोसले यांच्यासह राज्यातील अन्य उद्योजकांचीही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याची खातरजमा होऊ शकली नाही. तब्बल आठ त्यांची चौकशी करण्यात आली. पुण्यातही त्यांच्या बंगल्यावर ईडीच्या पथकाने चौकशी केल्याचे समजते. 

भोसले यांची मुंबईत चौकशी सुरू असताना त्यांच्या पुण्यातील निवासस्थानीही ईडीच्या पथकाने छापा टाकला, मात्र, त्यास दुजोरा मिळू शकला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची पथके शुक्रवारी दुपारी पुण्यात दाखल झाली होती. भोसलेंच्या बाणेर परिसरातील बंगल्यावर ही पथके पोचल्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्यांना मुंबईत बोलावल्यावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासोबतच अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर भोसले यांच्यावर झालेली कारवाई राजकीय क्षेत्रात चर्चेची ठरली आहे. भोसले यांच्या चौकशीचा तपशील रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही. 

भोसले यांचा बांधकाम व्यवसाय प्रामुख्याने पुण्यात आणि मुंबईत आहे. देशभर त्यांची कंपनी पायाभूत बांधकाम क्षेत्रात काम करते. त्यांच्या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे. भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७  साली अमेरिका आणि दुबई दौरा करून भारतात येताना परकीय चलन व महागड्या वस्तू अबकारी शुल्क (कस्टम ड्यूटी) न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. 
----//----
शिवाजीनगरच्या यशवंत घाडगेनगरमधील जमीन बेकायदा हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून भोसले यांच्यासह सहा जणांच्या विरोधात २०१६ साली चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध राजेश बजाज यांनी फिर्याद दिली होती. 
-------
 भोसले यांच्यावर यापूर्वी प्राप्तिकर विभागाने छापे टाकत महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. यावेळी त्यांचे जावई आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या कार्यालयावरही छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. 
--------
रिक्षाचालक ते बांधकाम व्यावसायिक..
पुण्यात रिक्षाचालक म्हणून काम करणाऱ्या भोसले यांनी अल्पावधीत बांधकाम क्षेत्रात काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी साधलेली प्रगती डोळे दिपवणारी आहे. पंचतारांकित हॉटेल, राज्यभरात विविध ठिकाणी मालमत्ता त्यांच्या कंपनिकडे आहे. मात्र, रिक्षावाला ते बडा बांधकाम व्यावसायिक हा त्यांच्या आर्थिक प्रगतीचा वेग नेहमीच चर्चेच्या भोवऱ्यात राहिला आहे. १९९५ मध्ये राज्यात सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजपा सरकारच्या काळातील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून भोसले यांचा 'प्रचंड' विकास झाल्याचे समजण्यात येते.

Web Title: Famous builder Avinash Bhosale interrogated by 'ED'; 'This' is the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.