प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकरांसह तिघांवर गुन्हा दाखल; २ कोटी ४० लाख रुपयांची केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 10:16 AM2021-09-12T10:16:00+5:302021-09-12T10:17:34+5:30
लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसायात तोटा झाल्याने देणेकर्यांच्या तगद्याला वैतागून निराशेतून उद्योजक गौतम पाषाणकर हे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घरातून निघून गेले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती.
पुणे : देणेकर्यांनी तगादा लावल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडून निघून गेलेले प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर शिवाजीनगर पोलिसांनी २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसायात तोटा झाल्याने देणेकर्यांच्या तगद्याला वैतागून निराशेतून उद्योजक गौतम पाषाणकर हे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घरातून निघून गेले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती.
दीप विजय पुरोहित (रा. कल्याणीनगर), गौतम पाषाणकर आणि रिनल पाषाणकर (रा. शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नरेंद्र पंडितराव पाटील (वय ४२, रा. सिल्व्हर स्प्रिंग सोसायटी, पंचवटी) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत सुरु आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र पाटील यांनी पाषाणकर यांच्या खराडी येथील प्रॉक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमधील सी बिल्डिंगमध्ये पी १०१ व १०२ हे फ्लॅट खरेदी करण्याचे ठरविले. त्यांची २ कोटी ८७ लाख रुपये किंमत ठरविण्यात आली. तसा लेखी करारनामा करण्यात आला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून २ कोटी ४० लाख रुपये घेतले.
मात्र, त्यानंतर त्यांनी मिळकतीचा ताबा व नोंदणीकृत दस्त न करता पी १०२ या सदनिकेचे खरेदी खत सुशील झोरर तर्फे कुलमुख्यत्यार म्हणून मनिषा गोरद (रा. रेंजहिल्स) व पी १०१ ही सदनिका गणेश शिंदे (रा. वडगाव शेरी) यांच्या नावावर करुन दिली़. याबाबत फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी ८ जून २०२० रोजी फिर्यादी यांना जंगली महाराज रोड येथील पाषाणकर ग्रुपच्या कार्यालयात बोलाविले. तेथे त्यांनी व त्यांच्या नोकरांनी मारहाण करुन फिर्यादी यांचा उजवा पाय फ्रॅक्चर केला़ अशी, नरेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर पोलिसांनी ४०९, ४२०, ३२६, ५०६, ३४ अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
व्यवसायासाठी गौतम पाषाणकर यांनी काही जणांकडून पैसे घेतले होते. व्यवसायात तोटा आल्याने त्यांच्याकडून पैशांसाठी तगादा सुरु होता. त्यामुळे नैराश्येतून उद्योजक गौतम पाषाणकर यांनी आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून २१ ऑक्टोंबर २०२० रोजी घर सोडून ते निघून गेले होते. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक कारणामुळे उद्योजक आत्महत्या करण्याच्या इराद्याने घर सोडून निघून गेल्याने पुण्यासह संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. ते पुण्यातून कोल्हापूरसह दक्षिणेतील अनेक शहरांमध्ये फिरले. त्यानंतर ते दिल्लीहून जयपूर येथे गेले होते. तेथे ते एका हॉटेलमध्ये उतरले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला मिळाली. या पथकाने जयपूर येथे जाऊन तब्बल ३३ दिवसांनी गौतम पाषाणकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुण्यात आणून कुटुंबियांच्या स्वाधीन केले होते. पोलिसांनी त्यांना परत आणल्यानंतरही आतापर्यंत पाषाणकर यांनी पैसे परत न दिल्याने शेवटी नरेंद्र पाटील यांनी फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.