‘गरीबांचे डॉक्टर’ असा नावलौकिक असलेले डॉ. बळवंत घाटपांडे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 05:25 PM2020-01-21T17:25:33+5:302020-01-21T17:37:23+5:30
विशेष म्हणजे जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची वैद्यकीय सेवा सुरू होती.
पुणे : ’ गरीबांचे डॉक्टर’ असा नावलौकिक मिळविलेले शहरातील सर्वांत जुने वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. बळवंत पंढरीनाथ घाटपांडे (वय १०५) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, मुलगी, जावई, नातू, नातसून असा परिवार आहे. विशेष म्हणजे जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची वैद्यकीय सेवा सुरू होती.
घाटपांडे हे ‘गरीबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध होते. कणखर प्रकृतीच्या डॉ. घाटपांडे यांनी आपल्या उत्पन्नातील वाटा सामाजिक संस्थांना देत संवेदनशील मनाचे दर्शन घडविले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या घाटपांडे यांचा डायबेटिक असोसिएशन पुणे शाखेने ‘मधुमेहासह यशस्वी जीवनाचे शिल्पकार’ असा गौरव केला होता. आखीव रेखील दिनचर्या, सात्विक आहार आणि नियमित व्यायाम यामुळे त्यांना दीघार्युष्य लाभले.
घाटपांडे यांचा जन्म १५ मार्च १९१५ रोजी जुन्नरजवळील आळे या गावी झाला. फायनलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. सरस्वती मंदिर रात्र प्रशाला येथून शिक्षण घेऊन ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. स. प. महाविद्यालयातून प्रिव्हीयसची परीक्षा देऊन त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय येथून ‘एलसीपीएस’ (लायसेन्सिएट इन मेडिकल अँड सर्जिकल) ही पदवी घेतली. १९४१ मध्ये डॉक्टर म्हणून ते शासकीय सेवेत दाखल झाले. १९४८ पासून त्यांनी कसबा पेठेत स्वत:चा दवाखाना सुरू केला. अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी वैद्यकीय सेवा केली.
.............................