पुण्यातील ही प्रसिद्ध हाॅटेल्स स्वच्छतेत फेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 03:14 PM2018-10-17T15:14:28+5:302018-10-17T15:22:09+5:30
पुण्यातील नामांकित हाॅटेल्समध्ये एफडीएकडून करण्यात अालेल्या तपासणीत स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याचे समाेर अाले अाहे.
पुणे : तरुणाईकडून व खवैयेगिरीची आवड असणा-या पुणेकरांकडून फर्ग्युसन रस्त्यावरील रुपाली,वैशाली व गुडलक या हॉटेल्समध्ये गर्दी केली जाते. मात्र,अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) करण्यात आलेल्या तपासणीत या सर्व हॉटेल्समध्ये स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सकाळी नाष्ट्यापासून रात्री उशीरा जेवन करण्यासाठी फर्ग्युसन रस्त्यावरील बहुतांश हॉटेलसमध्ये गर्दी होते.त्यात रुपाली,वैशाली व कॅफे गुडलक या हॉटेल्समध्ये इतरांच्या तुलनेत अधिकच गर्दी असते.मात्र,या हॉटेल चालकांकडून एफडीएच्या स्वच्छतेचा निकषाचे पालन केले जात नसल्याचे एफडीएने केलेल्या तपासणीत समोर आले आहे.त्यामुळे संबंधित हॉटेल्सला नोटीस बजावण्यात आली आहे.तसेच हॉटेल चालकांना सुधारणा करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.
ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असणा-या शहरातील सर्वोत्तम दहा (टॉप टेन)हॉटेल्सची तपासणी करावी, अशा सुचना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मुख्य कार्यालयाकडून देण्यात आला आहेत.त्यानुसार राज्यातील सर्वच विभागीय कार्यालयाकडून शहरातील टॉप टेन हॉटेल्सची तपासणी केली जात आहे.पुण्यातील हॉटेल्सची तपासणी जून महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे.त्याचाच एक भाग म्हणून एफडीएच्या अधिका-यांनी फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल्सची तपासणी केली.
एफडीएच्या सहाय्यक आयुक्त अपर्णा भोईटे म्हणाल्या, एफडीएकडून जाहीर करण्यात आलेल्या स्वच्छतेच्या मानाकानुसार सर्व हॉटेल्सने आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे.त्यात अन्न परवाना दर्शनी ठिकाणी लावणे, हॉटेल्समधील कामगारांची आरोग्य तपासणी करणे,पेस्ट कंट्रोल करणे,पाण्याची टाकी स्वच्छ करणे,शाकाहारी व मांन्साहारीसाठी वेगळी व्यवस्था करणे,ओला व सुका कचरा टाकण्यासाठी दोन वेगळ्या पेट्या ठेवणे,भांडी धुण्याची जागा स्वच्छ ठेवणे, वेटर्सने डोक्यात टोपी घालणे,अन्न तयार करण्याच्या जागेची स्वच्छता राहणे आवश्यक आहे. मात्र, यातील अनेक गोष्टींची काळजी रुपाली व वैशाली हॉटेल करून घेण्यात आली नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले.तर या दोन हॉटेल्स पेक्षा अधिक तृटी गुडलक मध्ये अढळून आल्या.