मुंबई-पुण्यानजीकची ही लोकप्रिय हनिमून डेस्टीनेशन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 02:55 PM2017-11-07T14:55:58+5:302017-11-07T15:01:57+5:30
परदेशात हनिमूनला जाणे प्रत्येकालाच शक्य नसते. मग त्यांच्यासाठी मुंबई-पुण्याजवळचे हे पर्याय चांगले ठरु शकतात.
पुणे : हनिमुनसाठी जम्मू-काश्मिर, कुलू मनाली, केरळ अगदीच भारताच्या बाहेर जायचं असेल तर सिंगापूर, पॅरिस वगैरे आहेच, पण कमी वेळात आणि कमी खर्चात हनिमुन साजरा करायचा असेल तर पुणे हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. एक चांगलं हॉटेल, हॉटेलच्या आजूबाजूला चांगली पर्यटन स्थळं आणि स्वादिष्ट जेवण एवढीच प्रत्येकाची अपेक्षा असते. मग त्यासाठी परगावी किंवा परदेशी जाण्याची गरज काय? पुण्यात आणि पुण्याच्या आजूबाजूला अनेक पर्यटन स्थळं, हॉटेल्स आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा हनिमुन प्लॅन करत असाल तर पुण्याची निवड करायला काहीच हरकत नाही.
खडकवासला
तलाव, धबधबे इत्यादी ठिकाणी एक प्रकारचा रोमँटीक मूड असतो. त्यामुळे तुमच्या आयुष्याची सुरुवातही जर अशाच सुंदर ठिकाणी केली तर कायमस्वरूपी लक्षात राहू शकेल. खडकवासल्याजवळच सिंहगड किल्लाही आहे. पुण्यापासून खडकवासला अगदी 15 किमी अंतरावर आहे. खडकवासलाजवळ अनेक रिसॉर्ट्स आहेत. तसेच अनेक आपल्या बजेटमध्ये बसतील अशी हॉटेल्सही आहेत. शिवाय तिकडचं जेवणंही स्वादिष्ट असतं. त्यामुळे तुमच्या राहण्याची आणि जेवणाची तिकडे नक्कीच चांगली सोय होऊ शकते.
लवासा
पुण्यापासून 60 किमी असलेला लवासा तुमच्या हनीमुनसाठी एक उत्तम पर्याय आहे. इटलीच्या धर्तीवर लवासा हे शहर बनवण्यात आलं आहे, त्यामुळे इकडे आल्यावर परदेशात आल्याचाच भास होतो. अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठीही लवासा फार प्रसिद्ध आहे. तसंच, वेगवेगळे कार्यक्रम, टूर इकडे होतच असतात. तुमचं जर कमी बजेट असेल तर इकडच्या हॉटेल मरक्यूरीला भेट द्या. अत्यंत कमी दरात इकडे तुमची राहण्याची आणि जेवणाची सोय होऊ शकते. एकांत दि रिट्रीट आणि फॉरच्यून सिलेक्ट डॅस्व ही हॉटेलं निश्चितच जरा महाग आहेत.
कुणे
पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर हे एक छोटंसं गाव आहे. खंडाळा तालुक्यात हे गाव वसलेलं आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इकडच्या दर्या. पक्षांच्या किलबिलाटात इकडचा दिवस सुरू होतो आणि सूर्याच्या किरणांनी संपूर्ण संध्याकाळ पिवळी होऊन दिवस मावळतो. तुम्ही निसर्गप्रेमी असाल, कॅम्पिंगमध्ये राहायला आवडत असेल तर तुम्हाला हॉटेलची गरजच नाही, कारण इकडे तुम्हील कॅम्पिंगचाही आनंद घेऊ शकता. एखाद्या तंबूत तुम्ही छान वेळ घालवू शकाल.
महाबळेश्वर
सामान्य लोकांसाठी महाबळेश्वर हेच एक लोकप्रिय मधुचंद्राचं ठिकाण आहे. मुंबई-पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने दोन्ही शहराकडून नवविवाहीत जोडपी इकडे एकदा तरी भेट देतातच. आता तर हिवाळाही सुरू झालाय. त्यामुळे तुमच्या मधुचंद्रासाठी महाबळेश्वरपेक्षा उत्तम जागा असूच शकत नाही. महाबळेश्वरमध्ये वर्षभर पर्यटकांची ये-जा सुरू असतेच, त्यामुळे इकडे तुमच्या बजेटमध्ये बसतील असे अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. पर्यटकांसाठी महाबळेश्वर हे महत्त्वाचं ठिकाण असल्याने देशभरातील पर्यटक इकडे सतत येतच असतात, त्यामुळे राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यासाठी तुम्हाला थोडासा तुमचा खिसा हलका करावा लागेल हे निश्चित.
लोणावळा
सह्याद्री पर्वत रागांच्या कुशीत असलेला लोणावळा सगळ्याच पर्यटकांना खुणावत असतो. धुक्यांच्या शहरात हरवून जायचं असेल तर लोणाळा हे बेस्ट हनीमून डेस्टीनेशन आहे. मुंबई आणि पुण्याच्या मधोमध असणाऱ्या या पर्यटन स्थळाला देशभरातील अनेक पर्यटक भेट देत असतात. पण आता हा भाग हनीमुन डेस्टिनेशन म्हणूनही ओळखला जात असल्याने नवजोडपीही इकडे आवर्जून भेट देत असतात.