ख्यातनाम चित्रकार रवी परांजपे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 02:44 PM2022-06-11T14:44:30+5:302022-06-11T14:45:26+5:30
परांजपे यांचे वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रातही चांगले काम
पुणे : प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचे पुण्यात आज दुपारी एका खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी परांजपे यांचे निधन झाले आहे. परांजपे यांची भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रातही चांगले काम केले.
जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमध्ये रवी परांजपे यांनी संशोधनपर लेखन केले. त्यांचे ‘ब्रश मायलेज’ हे आत्मकथन तसेच परदेशी चित्रकारांचा परिचय करून देणारे शिखरे रंगरेषांची आणि नीलधवल ध्वजाखाली हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे.
रवी परांजपे यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९३५ बेळगाव येथे झाला. रवी परांजपे यांच्या घरातच कलेचा वारसा होता. लहानपणी ते अभ्यासापेक्षा रंगांमध्येच रमायचे. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी हातात कुंचला दिला. त्यामुळे रवी परांजपे यांना मोठ्या चित्रकारांची चित्र पाहण्याचा छंदच जडला. यानंतर फोटोवरून ते स्मरण चित्र काढायला लागले, फोटोवरून यासाठी की, व्यक्तींच्या प्रमुख हालचाली दाखवणा-या रेघा या फोटोवरून अचूक टिपता यायच्या.
त्यांच्या करीयरची सुरुवात टाइम्स ऑफ इंडिया मधील नोकरीने झाली. तेथे ते जाहिरातींसाठी इल्युजन करायचे. नंतर रवी परांजपे यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रांत भारतामध्ये काम केले. त्यांनी नैरोबी, केनिया मध्येही काम केले.
रवी परांजपे यांनी अनेक जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे. नवचित्रकलेच्या प्रवाहाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहून त्यांनी अभिजात शैलीचा पाठपुरावा केला आहे. रवि परांजपे यांची शैली अनोखी आहे. सशक्त रेषा, सोपी आणि ओघवती मांडणी, त्रिमिती दाखवण्याचे वेगळे कसब, वेगवेगळे पोत कुंचल्यातून साकारण्याची ताकद त्यांच्या चित्रात दिसते.
दृश्य वास्तवाला दिलेला भावनिक प्रतिसाद परांजपे यांनी निर्मिलेल्या कलाकृतींमधून दिसतो. त्यामुळे त्यांचे रंग, ते हाताळण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यांची शैली त्यांची, स्वतःची आहे. अनेक वर्षांच्या चित्रसाधनेतून त्यांनी ती विकसित केली आहे. ते पुण्यात १९९० ला स्थायीक झाले. तेथे त्यांनी मोठा स्टुडिओ उभारला. ते एक उत्तम चित्रकार आहेतच, शिवाय एक चांगले कला समीक्षक, लेखक आहेत, आणि ह्या पलीकडे जाऊन ते सामाजिक जाणीव असलेले एक नागरिकही आहेत. १९९५ साली त्यांना कम्युनिकेशन आर्ट्स गिल्डतर्फे कॅग हॉल ऑफ फेम हा पुरस्कार देण्यात आला.
१९९६ साली त्यांना दयावती मोदी फौंडेशन आर्ट कल्चर आणि एज्युकेशनतर्फे दयावती मोदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन, पं. जसराज यांसारख्या मान्यवरांकडे त्यांची चित्रं असून जगभरात त्यांच्या चित्रांचे चाहते आहेत.