प्रसिद्ध कामशास्त्र तज्ज्ञ डॉ. शशांक सामक यांचे पुण्यात निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 11:35 AM2020-05-16T11:35:42+5:302020-05-16T11:37:27+5:30
कामशास्त्र हा एक अवघड पण समाजाच्या प्रबोधनाचा आणि जिव्हाळ्याचा विषय ते अतिशय सुगम, रंजक तसेच शास्त्रीय पद्धतीने मांडत.
पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध कामशास्त्र तज्ज्ञ डॉ. शशांक दत्तात्रय सामक (वय ६५ वर्षे) यांचे आज (१५ मे रोजी) हृदयाच्या तीव्र धक्क्यााने अकस्मात निधन झाले. डॉ. सामक यांचे नाव त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक योगदानामुळे पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. 'वैद्यकीय कामशास्त्र' हा त्यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
या खेरीज अनेक शोधनिबंध, विपुल लिखाण त्यांनी केले. कामशास्त्र हा एक अवघड पण समाजाच्या प्रबोधनाचा आणि जिव्हाळ्याचा विषय ते आपल्या व्याख्यानातून अतिशय सुगम, रंजक तसेच शास्त्रीय पद्धतीने मांडत.
चाळीशी नंतरचे कामजीवन हा त्यांचा अतिशय गाजलेला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र भर लोकप्रिय प्रयोग वारंवार होत. अतिशय हुशार, मेहनती आणि रसिक अशा डॉ. सामक यांचे वैद्यकीय शिक्षण पुण्यातील बी जे मेडिकल येथे झाले होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी (जेसिका), मुलगी (रसिका), नातू (ईशान) मुलगा (मिहीर) आणि वयोवृद्ध आई वडील आहेत. मोठा मित्र परिवार आणि लोकसंग्रह असलेल्या डॉ. सामक यांच्या निधनाने सर्वत्र शोकाचे वातावरण होते. मुलगा परदेशातून येऊ शकत नसल्याने त्यांची मुलगी, रसिका हिने वडिलांचे अंत्यसंस्कार केले.