पालिका कर्मचाऱ्यांच्या बदलीचा मार्ग मोकळा
By admin | Published: May 9, 2015 03:32 AM2015-05-09T03:32:51+5:302015-05-09T03:32:51+5:30
महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता अन्य समवर्गीय महापालिकेत बदली करून घेता येणे शक्य होणार आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या
पुणे : महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता अन्य समवर्गीय महापालिकेत बदली करून घेता येणे शक्य होणार आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या पुणे महापालिकेच्या सेवा नियमावलीत यासंबधीची तरतूद करण्यात आल्याने बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे आणि नागपूर या दोन्ही महापालिका ‘अ’ वर्ग दर्जात मोडत असल्याने नागपूरला जाण्यास तयार असलेल्या कर्मचाऱ्यांना या नियमावलीचा फायदा होणार आहे. दरम्यान, अशा प्रकारची तरतूद आपल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणारी पुणे महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. मात्र, या बदलीचे मार्ग नियमावलीत खडतर ठेवले असून एखाद्या कर्मचाऱ्यास बदली करून घ्यायची असल्यास दोन्ही महापालिकांची परवानगी बंधनकारक आहे. महापालिकेत भरती करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदे स्वतंत्र असतात, तसेच प्रत्येक महापालिकेच्या आर्थिक कुवतीनुसार, त्यांच्या वेतनश्रेणी ठरलेल्या असतात. अशी स्थिती असली तरी, अद्याप राज्यशासनाकडून प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणत्याही पालिकेच्या कर्मचाऱ्याची बदली दुसऱ्या महापालिकेत करण्याची तरतूद कायद्यात नाही. मात्र, पालिकेच्या सेवा नियमावतील ती उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावली २०१४ ला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यासंबधीचे राजपत्रही शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.