हेल्मेटच्या त्रासापासून फर्ग्युसनचा पार्किंगवाला करताे मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:45 PM2019-01-24T16:45:09+5:302019-01-24T16:49:11+5:30
विद्यार्थी आपली गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर हेल्मेट पार्किंगवाल्याकडे देतात. पार्किंगवाला ते हेल्मेट आपल्याजवळ सुरक्षित ठेवत असून विद्यार्थी जाताना हेल्मेट घेऊन जातात.
राहुल गायकवाड
पुणे : सध्या शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आल्याने हेल्मेट परिधान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सुरुवातील काही महाविद्यालयांच्या बाहेर पाेलिसांनी कारावाईला सुरुवात केली हाेती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हेल्मेट घालण्यास सुरुवात केली. हेल्मेट सर्व ठिकाणी हातात ठेवणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. त्यातच हेल्मेट चाेरीला जाण्याचा धाेकाही असताे. यावर आता फर्ग्युसनच्या पार्किंगवाल्याने ताेडगा काढला आहे. अनेक विद्यार्थी आपली गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर हेल्मेट पार्किंगवाल्याकडे देतात. पार्किंगवाला ते हेल्मेट आपल्याजवळ सुरक्षित ठेवत असून विद्यार्थी जाताना हेल्मेट घेऊन जातात.
1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेट सक्ती केल्याने हेल्मेट घालणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. तरुणांमध्ये सुद्धा हेल्मेटबाबत जागृती झाल्याने तरुण हेल्मेट वापरायला लागले आहेत. असे असताना हेल्मेट प्रत्येकवेळी साेबत ठेवणे शक्य नसते. त्याचबराेबर ते चाेरीला जाण्याचा आणि एखाद्या ठिकाणी विसरण्याचा देखील शक्यता असते. त्यामुळे महाविद्यालयात आल्यावर हेल्मेट ठेवायचे कुठे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यावर उपाय म्हणून फर्ग्युसन मधील पार्किंगवाल्याने विद्यार्थ्यांचे हेल्मेट ठेवण्यासाठी साेय केली आहे. विद्यार्थी गाडी लावल्यानंतर हेल्मेट पार्किंवाल्याकडे देतात आणि जाताना घेऊन जातात. यासाठी पार्किंगवाला विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क घेत नाही.
फर्ग्युसनचा पार्किंवाला उमेश म्हणाला, विद्यार्थ्यांच्या साेयीसाठी आम्ही त्यांचे हेल्मेट ठेवून घेताे. विद्यार्थी परत जाताना हेल्मेट घेऊन जातात. यासाठी आम्ही कुठलेही शुल्क आकारत नाही. परंतु हेल्मेट ठेवल्यानंतरची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असते. हेल्मेटसक्ती झाल्यानंतर ठेवण्यासाठी येणाऱ्या हेल्मेट्सची संख्या खूप वाढली आहे. तसेच हेल्मेट घालणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील 70 ते 80 टक्क्यांनी वाढली आहे.