Pune:"थ्री इडियटस’’ चा फरहान एफटीआयआयचा नवा अध्यक्ष; आर. माधवनची नियुक्ती
By नम्रता फडणीस | Published: September 1, 2023 09:16 PM2023-09-01T21:16:30+5:302023-09-01T21:17:05+5:30
‘रहेना है तेरे दिल मैं’, ‘थ्री इडियटस’ आणि ’रंग दे बसंती’ सारख्या चित्रपटांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध अभिनेते आर.माधवन एफटीआयआयचे अध्यक्ष
पुणे: ‘रहेना है तेरे दिल मैं’, ‘थ्री इडियटस’ आणि ’रंग दे बसंती’ सारख्या चित्रपटांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध अभिनेते आर.माधवन यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ 3 मार्च रोजी संपला. कोरोना काळातच त्यांची नियुक्ती झाल्याने एफटीआयआयमध्ये ते फारसे येऊ शकले नाहीत. आॅनलाइन माध्यमातूनच त्यांनी विद्याथर््यांशी संवाद साधला. तीन वर्षात अगदी मोजक्याच भेटी त्यांनी एफटीआयआयला दिल्या. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने पाच महिन्यानंतर एफटीआयआयच्या अध्यक्षपदासह नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी आर. माधवन यांची नियुक्ती केली आहे.
एफटीआयआयचा अध्यक्ष हा एफटीआयआय सोसायटीचाही अध्यक्ष असतो. सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी 12 नामनिर्देशित व्यक्ती आहेत. ज्यापैकी आठ 'प्रसिद्ध व्यक्ती' श्रेणी अंतर्गत नामांकित आहेत, तर चार एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत. संस्थेच्या अध्यक्षाची नियुक्ती करताना मंत्रालय सहसा सदस्यांना नामनिर्देशित करते, परंतु आॅक्टोबर 2017 मध्ये अनुपम खेर यांची नियुक्ती झाल्यावर ही परंपरा खंडित झाली आहे.
आर. माधवन यांनी थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू, रंग दे बसंती सारख्या चित्रपटांद्वारे स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे त्याने दिग्दर्शित केलेला ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाचे सर्व स्तरावर कौतुक झाले आहे. गेल्याच आठवड्यात ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.