जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच संपवलं; आंबेगाव तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:33 IST2025-02-26T18:31:14+5:302025-02-26T18:33:14+5:30

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने व त्यांच्या मुलांनी भावाला मारहाण करत गंभीर जखमी केले होते,

farmer brother ended brother the land dispute Incidents in Ambegaon Taluka | जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच संपवलं; आंबेगाव तालुक्यातील घटना

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच संपवलं; आंबेगाव तालुक्यातील घटना

मंचर: शेवग्याच्या शेंगा तोडण्याच्या कारणावरून तसेच जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने व त्यांच्या मुलांनी भावाला मारहाण करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना महाळुंगे पडवळ येथे आज घडली. चंद्रकांत सदाशिव चासकर (वय 69 रा. महाळुंगे पडवळ) असे खून झालेल्या भावाचे नाव असून याप्रकरणी त्यांचे भाऊ, भावजई व दोन पुतणे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

या संदर्भात मंचरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण चंद्रकांत चासकर यांनी फिर्याद दिली आहे. महाळुंगे पडवळ येथील चंद्रकांत चासकर व सुभाष चासकर यांच्या सामायिक शेत जमिनीची वाटणी अद्याप झालेली नाही. सदर शेतजमिनीवरून चंद्रकांत सदाशिव चासकर व त्यांचा भाऊ सुभाष सदाशिव चासकर यांच्यामध्ये वाद सुरू होता. मंगळवारी सायंकाळी चंद्रकांत चासकर, पत्नी नंदा चासकर, सून रूपाली चासकर तसेच किरण चासकर हे शेतातील शेवग्याच्या शेंगा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुभाष सदाशिव चासकर याने शिवीगाळ दमदाटी करत रूपाली चासकर यांच्या हातातील शेवग्याच्या शेंगा ओढून घेतल्या. किरण चासकर यांनी विचारणा केली असता पुण्यावरून मुलांना बोलावून घेऊन तुमच्याकडे बघतो अशी धमकी सुभाष चासकर याने दिली.

त्यानंतर आज सकाळी आठ वाजता चंद्रकांत चासकर यांच्या घरासमोर त्यांचे भाऊ सुभाष सदाशिव चासकर, भावजय मंदा सुभाष चासकर, पुतणे सचिन सुभाष चासकर, नितीन उर्फ दत्ता सुभाष चासकर हे सर्वजण आले. शिवीगाळ दमदाटी  करून त्यांनी चंद्रकांत चासकर यांना धक्का देऊन खाली जमिनीवर पाडले,  त्यानंतर चौघांनीही त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सुभाष चासकर हे चंद्रकांत चासकर यांच्या छातीवर बसून त्यांना ठोसे मारत होते. त्यावेळी मंदा चासकर यांनी पाय धरले होते. तर सचिन व नितीन चासकर हे लाथा बुक्क्यांनी मारहाण करत होते. वडिलांना वाचवण्यासाठी किरण चासकर पुढे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन चंद्रकांत चासकर हे बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ते मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यासंदर्भात किरण चासकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुभाष सदाशिव चासकर, मंदा सुभाष चासकर, सचिन सुभाष चासकर, नितीन उर्फ दत्ता सुभाष चासकर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर करत आहेत.

 

Web Title: farmer brother ended brother the land dispute Incidents in Ambegaon Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.