शेतकऱ्याची लेक बनली पोलीस उपनिरीक्षक, कान्हवडीच्या स्नेहा चव्हाणचे दैदिप्यमान यश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 02:21 PM2024-08-03T14:21:24+5:302024-08-03T14:23:35+5:30
प्रतिकुल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत एक शेतकऱ्याची लेक पोलीस उपनिरीक्षक बनली असून स्नेहा चव्हाण असं या शेतकऱ्याच्या लेकीच नाव आहे.
पांडुरंग मरगजे
धनकवडी: 'मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी' ही संत मुक्ताबाईंची काव्यपंक्ती असो की ' कोशीश करणे वालोंकी हार नहीं होती' ही छोट्याशा मुंगीच्या जिद्दीची गोष्ट सांगणारी कविता असो, मानवाची इच्छाशक्ती प्रदर्शित करते. अशीच इच्छाशक्ती दाखवत, जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत एक शेतकऱ्याची लेक पोलीस उपनिरीक्षक बनली असून स्नेहा चव्हाण असं या शेतकऱ्याच्या लेकीच नाव आहे.
दुष्काळग्रस्त खंडाळा तालुक्यातील कान्हवडी गावामध्ये स्नेहाचा जन्म एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला, वडील संजय हनुमंत चव्हाण प्रयोगशील शेतकरी म्हणून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत संसाराचा गाडा हाकत तर आई कुसुम घरकाम करुन मुलीच्या शिक्षणाला हात भार लावत, त्यांना एक मुलगा व दोन मुली. त्यापैकी स्नेहा ही सर्वात मोठी. स्नेहा ही लहानपणापासून हुशार, जिद्दी, अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीची मुलगी असून गावात प्रथम महिला पीएसआय होण्याचा मान तिने मिळवला आहे.
स्नेहाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण खानापूर येथील सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयात झाले
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास तिने स्वयं अध्ययन पध्दतीने करत परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करुन उत्तीर्ण झाल्याबद्दल कान्हवडी ग्रामस्थांसह धनकवडी, आंबेगावात तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
आई-वडिलांनी दाखविलेला विश्वास, शिक्षकांसह नातेवाईकांनी केलेले मार्गदर्शन आणि मित्र मैत्रिणींची साथ यामुळे मी हे यश संपादन करू शकले. पुढे परीक्षा देत उच्च श्रेणी अधिकारी होण्याचा मानस स्नेहाने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
लहानपणापासून स्नेहा हुशार आहे. तिला शिक्षणाची आवड होती. ती शासकीय सेवेत जाण्याचा हा विश्वास होता आणि तिने करून दाखविले. खूप आनंद होत आहे आणि खूप अभिमान वाटतोय. शेतीत केलेल्या कष्टाचे चीज झाले.
-संजय चव्हाण, स्नेहाचे वडील, शेतकरी