बैल उधळल्यामुळे झालेल्या अपघातात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:34 PM2019-08-19T14:34:56+5:302019-08-19T14:35:56+5:30
वृद्ध शेतकरी खटार गाडीत शेतासाठी खत घेऊन निघाले होते.
खेड (दावडी): बैलगाडी पलटी झाल्यामुळे ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मांजरेवाडी (पिंपळ ) (ता. खेड )येथे हे घडली आहे. शंकर राजाबा मांजरे रा. मांजरेवाडी (ता. खेड ) असे वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत विजय भाऊ मांजरे रा. मांजरेवाडी (पिंपळ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ( दि. १९ ) सकाळी दहा वाजताच्या सुमारास शंकर मांजरे हे बैलगाडी जुंपून खटार गाडीत शेतासाठी खत घेऊन निघाले होते. दरम्यान मांजरेवाडी ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून शेतात जात असताना बैलगाडीला जुंपलेल्या बैल अचानक उधळल्यामुळे खटार गाडीच्या धुऱ्या मोडून पडून खटार गाडी पलटी झाली. त्यामुळे मांजरे हे गाडीतुन खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले. ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्याच्या पाठीमागे पत्नी, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे अशी घटना घडल्यामुळे मांजरेवाडी शोककळा पसरली. याबाबत विजय भाऊ मांजरे रा. मांजरेवाडी (पिंपळ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..