विजेचा धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; सुपे नजीकच्या खोपवाडी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 11:53 PM2023-10-04T23:53:12+5:302023-10-04T23:54:32+5:30
सुपे: पावसाने उघडीप दिल्याने ज्वारीची पेरणी करुन सारे काढीत असताना वीज खांबाच्या तान दिलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच ...
सुपे: पावसाने उघडीप दिल्याने ज्वारीची पेरणी करुन सारे काढीत असताना वीज खांबाच्या तान दिलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना बुधवारी ( दि०४ ) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बारामती तालुक्यातील सुपे नजीक असणाऱ्या उत्तर खोपवाडीत घडली.
शहाजी रामचंद्र चांदगुडे ( रा. उत्तर खोपवाडी, दंडवाडी ) असे या मृत्यु झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. येथील ग्रामस्थांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, खांब उभा केल्यावर खांबाला ताण दिला जातो, त्या ठिकाणी चिनीमातीचा कप असतो. मात्र या ठिकाणी हा कप नसल्याने थेट वीज प्रवाह या ताणतारेत उतरला होता. तर पेरणी केल्यावर सारे काढीत असताना या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यु झाला. याला जबाबदार वीज वितरण कंपनी असल्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले होते. या घटनेला वीज वितरण कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला मदत मिळाल्या शिवाय येथील मृत्युदेह हलवु देणार नाही, अशी भुमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. येथील घटना घडुन चार तास उलटुनही वीज वितरणचे अधिकारी येत नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते.
दरम्यान सुपे पोलिस स्टेशनचे सपोनी नागनाथ पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी भेट देवुन माहीती घेतली. तर उशीरा येथील वीज वितरणचे शाखा अभियंता चव्हाण आले. त्यांनी याबाबत पहाणी करुन शेतकऱ्याच्या कुटुंबाला सर्वोतोपरी मदत मिळवुन देवु असे सांगितले. त्यानंतर पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. चांदगुडे यांच्या मागे पत्नी दोन लहान मुले आणि आजारी आई, वडील असतात. येथील घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.