ऊसाचा रस घेऊन साखर आयुक्तांची आंदोलकांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 08:51 PM2019-01-15T20:51:34+5:302019-01-15T20:53:39+5:30
मंगळवारी सायंकाळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलक शेतक-यांबरोबर ऊसाचा सर घेवून चर्चा केली.तसेच एफआरपीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
पुणे: बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदार संघातील तीन साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपी (उसाचा रास्त आणि किफायतशीर दर) दिली नाही.त्याच्या निर्षेधार्थ शिवसेनेने साखर आयुक्त कार्यालयासमोर रसवंतीगृह सुरू करून अनोख्या पध्दतीने आंदोलन सुरू केले.मंगळवारी सायंकाळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलक शेतक-यांबरोबर ऊसाचा सर घेवून चर्चा केली.तसेच एफआरपीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
साखर कारखाने सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला.मात्र,बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदार संघातील लोकनेते सुंदरावजी सहकारी साखर कारखाना,छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि जय महेश सहकारी साखर कारखाना या तीनही साखर कारखान्यांनी शेतक-यांची एफआरपी दिली नाही.त्यामुळे बीड जिल्हातील माजलगाव शिवसेना तालुका प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी व त्यांच्या सहका-यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर रसवंतीगृह सुरू करून २ रुपये दराने ऊसाच्या रसाची विक्री करत आंदोलन केले.त्यावर स्वत: साखर आयुक्त यांनी आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांची भेट घेवून त्यांच्या बरोबर ऊसाचा रस घेऊन चर्चा केली.तसेच ऊसाच्या रसाचे पैसेही शेतक-यांना दिले.
दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांनी कसाबसा ऊस जगवला.कारखानदारांकडे खेटा मारून कारखान्यापर्यंत पोहचवला.परंतु,कारखान्याला ऊस जाऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेले.तरीही एफआरपी मिळत नाही.त्यामुळे साखर आयुक्तालयासमोर आंदोलन सुरू केले.येत्या १५ जानेवारीपासून सर्व शेतकरी आपल्या कुटुंबासह आंदोलन करणार आहेत,असे जाधव यांनी सांगितले.