शेतकरी संपाने जनजीवन विस्कळीत
By admin | Published: June 3, 2017 02:24 AM2017-06-03T02:24:10+5:302017-06-03T02:24:10+5:30
बळीराजाने पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्याच दिवसापासून शहराला महागाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आवक घटल्याने
पिंपरी : बळीराजाने पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्याच दिवसापासून शहराला महागाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आवक घटल्याने मंडईंमधील पालेभाज्या गायब होऊ लागल्या आहेत, तर आहेत त्या भाज्यांचे भावही गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. दुधाची टंचाई जाणवू लागल्याने शहरवासीय गॅसवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशीच परिस्थिती पुढे कायम राहिली तर शहराचे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याशिवाय राहणार नाही.
भाज्यांचे दर कडाडले
लोकमत न्यूज नेटवर्क
निगडी : विविध प्रश्नांवर वारंवार मागण्या करून, आंदोलने करूनही सरकार प्रतिसाद देत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अखेर संप पुकारल्याने आकुर्डी आणि यमुनानगर येथील भाजी मंडईत त्याचा परिणाम लगेचच दिसून आला. भाज्यांचे दर लगेचच कडाडले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सर्व ठिकाणच्या भाजी मंडईंमध्ये शेतकऱ्यांनी आपला कोणताही शेतमाल विकायला न आणल्यामुळे शेतमालाची ५० टक्के आवक घटली आणि व्यापाऱ्यांनीही लगेचच त्यांच्याकडे असलेल्या भाज्यांचे दर प्रचंड प्रमाणात वाढविले.
गुलटेकडी मार्केटला शुक्रवारी सकाळी भेंडी ७० ते ८० रु़ किलो, टमॅटो ४० रु़, मिरची ६० रु़ किलो व इतर पाले भाज्यांमध्ये २० ते ३० टक्क्याने वाढ करण्यात आली. फक्त २० टक्के माल पाले भाज्या गुलटेकडी मार्केटला उपलब्ध होत्या; परंतु शुक्रववारी बाजार भाव जास्त असल्याने भाजी विक्रेत्यांनी पालेभाजी खरेदी केली नाही.
आकुर्डी येथील भाजी मंडईच्या ठिकाणी चिखली, चऱ्होली, शेलपिंपळगाव, खेड, सुदुंबरे, मावळ, मुळशी अशा तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचा शेतमाल पहाटे विक्रीस येत असतो; तसेच पुणे मार्केटमधूनही ८० टक्के शेतमाल येथे विक्रीस येत असतो. एकूण २७ प्रकारच्या भाजीपाला या ठिकाणी विक्रीस उपलब्ध असतात.
निगडी आकुर्डी प्राधिकरण आदी परिसरातून बहुसंख्य नागरिक भाजी खरेदीसाठी येत असतात. तर आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केलेला शेतमाल असल्यामुळे भाव कमी असतो. यामुळे मावळ, व उपनगर भागातूनदेखील हॉटेल व्यावसायिक आणि मेसचालक यांच्याकडूनही येथे भाज्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते; मात्र शेतकरी संपामुळे दररोज जी आवक होते त्यापेक्षा ५० टक्के आवक कमी झाली आहे. सध्या जो शिल्लक माल आहे तोच माल विकला जात आहे़
नागरिकांचे हाल सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : जगाचा पोशिंदा बळीराजा गुरुवारपासून संपावर गेल्यामुळे रावेत आणि परिसरातील भाजीविक्रेत्यांची दुकाने बंद आहेत. परिसरातील रावेत प्राधिकरण, गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी शिवाजी चौक, चिंतामणी चौक, सायली कॉम्प्लेक्स आदी परिसर नेहमी सकाळ संध्याकाळ भाजी विक्रेत्यांनी गजबजलेला असतो. परंतु कालपासून शेतकरी संपावर गेल्यामुळे बाजारात भाज्यांची आवक न झाल्याने किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला उपलब्ध झाला नाही. त्यामुळे परिसरातील नेहमी भाजीविक्रेत्यांनी गजबजलेली ठिकाणे ओस पडली आहेत.
भाजी विक्रेत्याकडे भाज्या उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना मात्र विनाभाजी दिवस काढावा लागत आहे. घरात असणाऱ्या कडधान्यांचा वापर महिला भाजीसाठी करीत आहेत. काही तुरळक दुकानदाराकडे थोड्याफार प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या भाज्या चढ्या दराने विकले जात होते. दुधाच्या विक्री किमतीमध्ये काहीप्रमाणात दुकानदारांनी वाढ केली आहे. नाइलाजाने ग्राहकांना चढ्या दराने भाज्या आणि दूध विकत घ्यावे लागत आहे़ भाज्यांसह फळांची विक्री चढ्या दराने होत आहे़ अचानकपणे भाववाढ करून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत़
शेतकरी संपावर असल्याने भाजी मंडईत भाज्या उपलब्ध झाल्या नाहीत़ कोणत्याच प्रकारे भाज्यांचा लिलाव झाला नसल्यामुळे मार्केट वरून रिकाम्या हाताने परतावे लागले़ रोज भाजी विक्री करून २०० ते ३०० रुपये मिळत होते. त्यावर कुटुंब चालवत होतो. संपामुळे भाजी विक्री बंद झाली.
- भगवान निलंगेकर,
भाजी विक्रेते
शेतकऱ्याचे हाल होत आहेत, यात दुमत नाही. सरकारने कर्जमाफीचा विचार अन्यथा इतर पर्यायी व्यवस्था करायला हवी. मात्र, यामुळे आमच्यासारख्या सामान्य शहरी लोकांना या निमित्ताने व्यापाऱ्यांकडून लुटले जात आहे. भाज्यांचे दर न परवडणारे होणार त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
- अश्विनी जाधव, गृहिणी
कृषी क्षेत्रच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. मात्र, शेतमालाला हमीभाव न मिळाल्याने रोज शेतकरी मरत आहेत. याचा मोठा फटका संपाच्या रूपाने आता सामान्य जनतेला बसणार आहे. यासाठी सरकारने आवश्यक त्या हालचाली करून चर्चा कराव्यात आणि हा प्रश्न मार्गी लावावा.
- नीलेश भालेकर, शेतकरी, तळवडे
ज्या प्रमाणे शेतकरी कष्ट करतो, पीक काढतो. तसेच सामान्य माणूसही मेहनत करतो आणि रोजच्या महागाईला तोंड देत असतो. दोघांच्याही समस्या सारख्या आहेत. सरकारने राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. असेच चालत राहिले तर शेतकऱ्यांच्या रूपाने सामान्य जनतेलाही या सगळ्याचा त्रास सहन करावा लागणार यात वाद नाही.
- वर्षा भोसले, गृहिणी
विकृतींना आळा घालणे गरजेचे
सर्वच विषयावर केवळ फेसबुक पोस्ट टाकून धन्यता मानणारे अनेक युवक सध्या या साईडवर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. परंतु या माध्यमातून अनेकदा विविध क्षेत्रांतील मान्यवर, नेतेमंडळी, संघटना व जातीवादावर सर्रासपने टीका केली जाते. ही आज नित्याची बाब असली तरीही कधीकधी टीकेची पातळी अतिशय खालच्या पातळीवर, तसेच अनेक नेत्यांचा एकेरी उल्लेख करून केलेल्या आढळून येतात. राज्यभरात शिस्तबद्धपणे चाललेल्या या संपावरही या तथाकथित सोशल मीडिया प्रेमींच्या कारनाम्याने गालबोट लागू नये, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे.
वांगी शंभर रुपये किलोवर
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळे गुरव : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपामुळे दूध व भाजीपाल्याचे भाव प्रचंड कडाडले आहेत. सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव परिसरामध्ये इतर पालेभाज्यांसह वांग्याचा भाव शंभर रुपये किलोवर पोहचला आहे.
सांगवी, पिंपळे गुरवला भाजीपाला खडकी, पिंपरी भाजीमंडई, मार्केट यार्ड येथून उपलब्ध होतो. छोटे व्यावसायिक ठोक खरेदी करून किरकोळ विक्री करतात. भाजीपाला, दूध या वस्तू रोजच्या रोज नागरिकांसाठी गरजेच्या आहेत; परंतु वस्तूची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर प्रचंड प्रमाणात वाढविले जात आहेत. रोज सकाळी व सायंकाळी दारावर ऐकू येणारा भाजी विक्रेत्यांचा आवाज काही प्रमाणात कमी झाला आहे. कांदे, बटाटे, पालक, मेथी, कोथिंबीर, टमाटे, भेंडी, गवार, शेवगा, फ्लावर आदींचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रत्येक भाज्यांचे भाव शंभर रुपये किलोच्या आसपास आहेत. नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडीत भाजीमंडई नसल्याने ग्राहकांना हातगाडीवाल्यांकडे भाजी खरेदी करावी लागते. मात्र, रस्त्यावर हातगाडी दिसत नाही. रोज किलोवर भाजी घेणाऱ्यांना आज पावशेर भाजी मिळविणे कठीण झाले आहे.
हा संप मिटला नाही, तर ग्राहकांना आणखी महागाई वाढीचा सामना करावा लागेल. दूध व पालेभाज्यांसाठी वणवण करावी लागेल. तसेच चढ्या दराने खरेदी करावी लागेल. त्यातच व्यापारी वर्गाकडून भाजीपाला व दुधाचा साठा करून अडचण निर्माण केली जात आहे. याचा सर्व सामान्य ग्राहकांना फटका बसणार आहे.- सविता लाटे, भाजी विक्रेत्या, सांगवी.
भाजी घेण्यासाठी माझ्या चार-पाच फेऱ्या झाल्या आहेत़ आता दोन तीन भाजी विक्रेत्यांनी दुकाने उघडली आहेत़ मात्र, भाजीचे दर दुपटीने वाढले आहेत. आर्थिक नियोजन कोलमडून गेले आहे. - मंगल काळभोर, गृहिणी