शेतकरी सापडला दुहेरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:55+5:302021-04-15T04:09:55+5:30
गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलांचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाबरोबरच या हवामानाच्या बदलांनाही सामोरे जावे ...
गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलांचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाबरोबरच या हवामानाच्या बदलांनाही सामोरे जावे लागत आहे. शेतीचे उत्पन्नही कमी आले आहे. त्यातच गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट सतत भेडसावत आहे. कोरोनामुळे वांरवार लॉकडाऊनसारख्या पर्यायांचा वापर करावा लागत आहे. त्याचा शेतमालावर परिणात होत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
शेतात पिकवलेला माल ज्यावेळी बाजारात आणला जातो त्यालाही सध्याच्या परिस्थितीत भाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतीमाल भाजीमंडईत विक्रीला न्यायचा की नाही असा ही प्रश्न भेडसावत असल्याने तूर्त तरी शेतकरी आर्थिक विवंचनेत असल्याचे चित्र दिसत आहेत.
यासंदर्भात बोरीबेलचे शेतकरी हनुमंत पाचपुते म्हणाले की, कोरोना होईल या भीतीने शेतकरी शेतीमाल शहरीभागात विक्रीला नेण्यासाठी घाबरत आहे तर दुसरीकडे गावपातळीवर सर्वच माल विकला जाईल, याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांचा पिकवलेला शेतीमाल शेतातच पडून राहत असल्याने सध्यातरी शेतकऱ्यांपुढे नुकसानीचा सपाटा सुरू आहे.
पारगाव येथील शेतकरी पोपटराव ताकवणे म्हणाले, की जोपर्यंत शासन शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला हमीभाव ठरवून देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक पडझड सुरू राहील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीमाल नुकसानीचे आर्थिक पॅकेज जाहीर करून नुकसान भरपाई दिली तरच शेतकरी आर्थिकदृष्ट्या तग धरेल.