पुणे : पोळे गावातील शेतकऱ्याचा वनव्यात आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 04:26 PM2022-06-04T16:26:01+5:302022-06-04T16:28:39+5:30
आगीत होरपळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
मार्गासनी (पुणे) : पानशेत धरण खोऱ्यातील पोळे गावातील शेतकऱ्याचा वनव्यात आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (ता.०३)रोजी सकाळी ११.३०च्या सुमारास घडली. तुकाराम भाऊ निवंगुणे(वय-६५) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मयत व्यक्तीचा मुलगा नितीन निवंगुणे यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली.
माहिती देताना नितीन निवंगुणे म्हणाले, 'घराच्या पाठीमागे असलेल्या शेतामध्ये लाकडे घेऊन येतो असे सांगून गेले वडील बराच वेळ घरी न आल्यामुळे मी व माझी आई वडिलांना पाहण्यासाठी गेलो त्यावेळी आमच्या शेताजवळ वनवा लागल्याचे दिसले. यामध्ये शोध घेत असताना बांधाच्या खालच्या बाजूस शेतातील वनव्यामध्ये वडील पडलेले आढळले.
वडिलांना घेऊन वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रकांत भोईटे यांनी तुकाराम निवंगुणे हे ९५% भाजले असल्याने त्यांना मृत घोषित केले.
पानशेत परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असूनसुद्धा येथील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने पानशेत परिसरातील भागातील जनतेला आरोग्यबाबतच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उपचारासाठी वीस किलोमीटर तालुक्याच्या ठिकाणी वेल्हे येथे जावे लागते. रुग्णांवर पानशेत येथे प्राथमिक उपचार झाल्यास जीव वाचण्यास मदत होईल यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसे आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स उपलब्ध व्हावे अशी मागणी येथील स्थानिक लोकांनी केली आहे.