बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:41 PM2017-09-17T23:41:17+5:302017-09-17T23:41:30+5:30
ढाकाळे (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत बिबट्याने एका शेतक-यावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. संतोष दत्तात्रय काळे असे या शेतक-याचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली.
घोडेगाव : ढाकाळे (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत बिबट्याने एका शेतक-यावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. संतोष दत्तात्रय काळे असे या शेतक-याचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली.
ढाकाळे परिसरात बिबट्याच्या पाऊलखुना यापुर्वीही आढळून आल्या होत्या. दोन दिवसांपासून येथील नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते. शनिवारी ढाकाळेमधील एका शेतक-याच्या गायीवर बिबट्याने हल्ला करून गायीला ठार केले होते. सकाळी संतोष काळे नेहमीप्रमाणे शेतात बैले सोडून घरी जात होते. यावेळी झुडपात लपला असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्याने संतोष काळे घाबरले. झटापटीत ते जमिनीवर पडले. जवळच जमिनीवर पडलेला दगड उचलून त्यांनी बिबट्याच्या दिशेने फेकला. त्यामुळे बिबट्या बाजूला पळाला. याचा फायदा घेत संतोष काळे यांनी पळ काढला व गाव गाठले. गावात येऊन ग्रामस्थांना घडलेला प्रकार सांगितला. ग्रामस्थांनी त्यांना घोडेगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच ढाकाळेमध्ये पिंजरा लावून हा बिबट्या पकडावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
दरम्यान घोडेगाव विभागाचे वनक्षेत्रपाल योगेश महाजन यांनी ग्रामीण रुग्णालयात जावून संतोष काळे यांची भेट घेतली. तसेच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. काळे यांच्या उपचाराचा खर्च वन विभाग करेल असेही त्यांनी सांगितले.