शतावरीच्या पिकाने इंदापुरातील शेतकरी लखपती; एका झाडाच्या मुळाचे वजन तब्बल १४ ते १६ किलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:33 PM2018-02-23T13:33:31+5:302018-02-23T13:36:36+5:30
शेतीतज्ज्ञांची भाकिते, कृषीविषयक पुस्तकातील सर्व ठोकताळे मोडून काढत, राज्यात पहिल्यांदाच घेतलेल्या शतावरीच्या पिकाने इंदापुरातील माळवाडी नं.२ च्या धनाजी सुर्वे या शेतकºयाला लखपती होण्याचा मार्ग दाखवला आहे.
इंदापूर : शेतीतज्ज्ञांची भाकिते, कृषीविषयक पुस्तकातील सर्व ठोकताळे मोडून काढत, राज्यात पहिल्यांदाच घेतलेल्या शतावरीच्या पिकाने इंदापुरातील माळवाडी नं.२ च्या धनाजी सुर्वे या शेतकऱ्याला लखपती होण्याचा मार्ग दाखवला आहे.
सामान्यत: शतावरीच्या एका झाडाच्या मुळाचे सरासरी वजन अडीच ते तीन किलो असते, असे कृषितज्ज्ञांचे भाकीत असते. सुर्वे यांनी लावलेल्या शतावरीच्या एका झाडाच्या मुळाचे वजन तब्बल १४ ते १६ किलो आहे. त्यांनी १ हजार २५० झाडे लावली. त्यातून सरासरी १४ टन ओल्या मुळांचे उत्पादन होईल.
खर्च वजा जाता सुर्वे यांना ७ लाख नफा अपेक्षित आहे. याशिवाय त्यांनी शतावरीमध्ये तिहेरी आंतरपीक घेऊन २ लाख ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. सुर्वे यांच्या रानातील शतावरीच्या काढणीस शनिवारी (दि. १७) मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. आयुष मिशनच्या माध्यमातून राज्यात सन २०१३ पासून सुगंधी व औषधी वनस्पती लागवड अभियान राबवले जाते.
आंतरपीक भरघोस
सुर्वे यांनी शतावरीमध्ये मिरचीचे आंतरपीक घेऊन २ लाख ८४ हजार रुपये मिळवले. कलिंगडाचे आंतरपीक घेऊन ९६ हजार रुपये मिळवले, तर कांद्याचे पीक घेऊन ७२ हजार रुपये मिळवले. जवळपास ४ लाख ५० हजार रुपयाची आंतरपिके त्यांनी सेंद्रिय पद्धतीने घेतली. खर्च वजा जाता त्यांना २ लाख ५० हजार रुपयांचा फायदा या तिहेरी आंतरपिकातून झाला.