कृषी आयुक्तालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 10:13 PM2018-10-05T22:13:38+5:302018-10-05T22:14:08+5:30
नेवासा तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याच्या गैरकारभाराची तक्रार करुनही कारवाई का केली जात नाही, याचा जाब विचारत एका शेतकऱ्याने शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
पुणे : नेवासा तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याच्या गैरकारभाराची तक्रार करुनही कारवाई का केली जात नाही, याचा जाब विचारत एका शेतकऱ्याने शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पुणे रेल्वे स्थानकाजवळील कृषी आयुक्तांच्या दालनाबाहेरच ही घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखत कर्मचारी आणि उपस्थितांनी आग विझविल्याने शेतकऱ्यास कोणतीही इजा झाली नाही. दीपक धनगे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे.
धनगे याने नेवासा तालुका कृषी अधिकाऱ्याविरोधात कृषी आयुक्तांकडे तक्रार केली होती. तालुका अधिकारी गैरव्यवहार करीत असल्याचा त्याचा आरोप होता. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का केली जात नाही, याची माहिती घेण्यासाठी संबंधित शेतकरी आणि पाच ते सात जण आयुक्तालयात आले होते. कृषी आयुक्त दालनात उपस्थित नव्हते. ते पाहिल्यानंतर शेतकरी दालनाबाहेर आला. सुरुवातीस त्याच्याकडील रुमाल पेटवित स्वत:ला पेटविण्याचे म्हणू लागला. रुमाल विझल्याने त्याने काडी पेटवून सदयाला लावली. इतरांनी त्याच्याकडे धाव घेत आग विझविल्याने शेतकऱ्यास कोणतीही इजा झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
संबंधित शेतकऱ्याने नेवासा तालुका अधिकाऱ्याविरोधात पत्र दिले होते. त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. मात्र, अधिकाऱ्यावर कारवाई का करीत नाही, असा जाब विचारत त्याने आयुक्तालयाला आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता, अशी माहिती कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.