शेतकरी महिलेने एक एकरमध्ये ७०० टन झेंडूचे उत्पादन घेत लाखो कमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 07:44 PM2019-02-07T19:44:46+5:302019-02-07T19:46:06+5:30
यशकथा : एक एकर क्षेत्रात झेंडूच्या पिकाची यशस्वी लागवड करून भरघोस उत्पादन घेण्याची किमया करून दाखविली आहे.
- राहुल शिंदे ( पुणे)
एकीकडे शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशात शेती तोट्यात जात असल्याने दररोज शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडीत आहेत. मात्र, अनेक असे शेतकरी आहेत, ज्यांनी जिद्द व कठोर परिश्रमाच्या बळावर शेतीत भरघोस नफा मिळविला आहे. मंचर, जिल्हा पुणे येथील प्रगतशील महिला शेतकरी वनिता विलास बेंडे यांचेही नाव यशस्वी शेतकऱ्यांमध्ये येत असून, त्यांनी एक एकर क्षेत्रात झेंडूच्या पिकाची यशस्वी लागवड करून भरघोस उत्पादन घेण्याची किमया करून दाखविली आहे.
मंचर येथील वनिता विलास बेंडे व त्यांचा मुलगा विशाल विलास बेंडे या माय-लेकांनी एक एकर क्षेत्रात ठिबक व मल्ंिचग पेपरचा वापर करून कोलकाता जातीच्या झेंडूचे पीक घेतले आहे. दसरा, दिवाळी या सणाच्या हंगामात मागणी असल्याने त्यांच्या झेंडूला बाजारात २५ ते ७० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. एक एकर मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये झेंडूचे त्यांना सुमारे सातशे टनापर्यंत उत्पादन झाले. यातून त्यांना तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळाल्याचे विशाल बेंडे यांनी सांगितले.
ऑक्टोबर ते जानेवारी या काळातील झेंडूची लागवड करण्यासाठी सुरुवातीला ट्रॅक्टरने उभी-आडवी खोल नांगरट करावी लागते. महिनाभर जमीन चांगली तापल्यानंतर जमिनीचा पोत चांगला सुधारतो. नांगरणीमुळे भुसभुशीत झालेल्या या जमिनीत ४ फूट रुंदीचे बेड करून काकरी पाडून त्यात २ ट्रक कुजलेले शेणखत व लिंबोळी पावडर यासह बुरशीनाशकाचा डोस मजुरांच्या माध्यमातून पसरविला.
बेड उजळवून त्यावर ठिबक सिंचन नलिका पसरविल्या. ओलावा टिकण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला. मल्चिंगला दीड फूट अंतरावर झिकझॅक पद्धतीने छिद्र पाडून त्यात झेंडूची लागवड करण्यात आली. त्यासाठी त्यांनी अभिषेक रोपवाटिकेतून १ रुपया २० पैसे प्रती रोप याप्रमाणे ७ हजार झेंडूची रोपे आणून लागवड केली. लागवडीनंतर एक महिन्यात कळ्या आल्या. मात्र पहिल्या आलेल्या कळ्या खुडून टाकण्यात आल्या, यामुळे झाडे जोमदार होण्यास मदत झाली. झेंडू पिकाला वेळोवेळी खताची मात्रा देण्यात आली. तसेच औषध फवारणी केल्यामुळे पीक जोरदार आले. नियमितपणे फुलांचा तोडा सुरू झाल्यानंतर दर ४-५ दिवसांनी तोडा केला गेला. परिसरातील मजुरांना त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला.
बेंडे यांनी उत्तम नियोजन व तांत्रिक पद्धतीचा वापर करून घेतलेल्या झेंडूच्या फुलाच्या शेतीला परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी भेटी देऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. या काळात दररोज कोणी ना कोणी भेट देत असल्याचे बेंडे यांनी सांगितले. या शेतकऱ्यांना संतोष हिंगे, संतोष खेमनर, प्रवीण आजाब, गोकुळ निकम, हनुमंत सोन्नर, विलास बेंडे यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने बाजारभावाची हमी दिल्यास तरुण वर्ग शेतीकडे वळेल. शेतकऱ्यांनी शेतीत विविध प्रकारचे प्रयोग केल्यास निश्चित फायदा होईल, असे वनिता बेंडे यांनी सांगितले.