शेतकरी महिला फक्त शेतात राबण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:59+5:302021-03-08T04:11:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : शेताची मशागत, बी पेरणी, खुरापणी, पाणी देणे आणि शेतीमाल काढणी आदी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : शेताची मशागत, बी पेरणी, खुरापणी, पाणी देणे आणि शेतीमाल काढणी आदी सर्व कामे करण्यासाठी घरातील महिला शेतात राब राब राबत असते. परंतु याच शेतीमालाचे पैसे करण्याची वेळ येते तेव्हा घरातील पुरूष पुढे येतात, ही कामे बायकांची नाही सांगत सर्व आर्थिक व्यवहार घरातील पुरुष करतात. यामुळेच गेल्या अनेक वर्षांत एकही महिला कष्ट करून पिकवलेला शेतीमाल विक्रीसाठी मार्केट यार्डात घेऊन येत नसल्याची वस्तुस्थित ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आली.
पुण्यातील मार्केट यार्डात किती शेतकरी महिला आपला शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येतात याबाबत पाहणी करण्यात आली. यामध्ये वरील वस्तुस्थिती समोर आली. जिल्ह्यात अनेक शेतकरी महिला अत्यंत किफायतशीरपणे शेती करता असल्याची हजारो उदाहरणे आहेत. शेतात प्रचंड कष्ट करून हजारो, लाखो रुपयांचा शेतीमाल महिला पिकवतात, पण याच शेतीमालाचे पैसे करण्याची वेळ येते तेव्हा घरातील पुरुष पुढे येतो. यामुळे कष्ट करणारी ही महिला आर्थिक व्यवहारांपासून पासून नेहमीच दूर असल्याचे वास्तव समोर आले.
---------
मी मार्केट यार्डात गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून भाजीपाल्याचा व्यवसाय करतोय. पण आता पर्यंत एकही शेतकरी महिला आपला शेतीमाल विक्रीसाठी स्वत: मार्केटमध्ये आल्याचे उदाहरण आठवत नाही. शेतीमाल घेऊन येणारे शंभर टक्के पुरुष शेतकरीच असतात.
- विलास भुजबळ, भाजीपाला व्यापारी
------
काही शेतकरी शेतीमालाची पट्टी महिलेच्या नावे करते
मार्केट यार्डात शेतीमाल घेऊन येण्यासाठी रात्री उशिरा किंवा पहाटे यावे लागते. तसेच माल संपेपर्यंत मार्केटमध्ये थांबावे लागते. या वेळा महिलांच्या सोयीच्या नसल्याने कदाचित शेतकरी महिला शेतीमाल विक्रीसाठी येत नसतील. असे असले तरी गेल्या काही वर्षांत शेतकरी महिलांच्या नावे शेतीमालाची पट्टी करण्याचे प्रमाण वाढत आहे.
- रितेश पोमण, कांदा- बटाटा व्यापारी
-------
महिला शेतकरी भवन बंद करण्याची वेळ
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी महिलांच्या सोयीसाठी बाजार समितीच्या वतीने महिला शेतकरी भवन बांधण्यात आले. परंतु हे शेतकरी भवन बांधल्यापासून आता एकाही शेतकरी महिलेने याचा वापर केला नाही. यामुळेच आता हे महिला शेतकरी भवन बंद करून व्यापारी भवन करण्याचा विचार सुरू आहे.
- मधुकांत गरड, प्रशासक पुणे बाजार समिती