उजनीच्या पाणी प्रश्नाबाबत इंदापूरात शेतकरी आक्रमक! तालुक्यात रास्ता रोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 03:56 PM2021-05-21T15:56:48+5:302021-05-21T15:57:01+5:30
पाणी न देण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी
वडापूरी: उजनीतील पाच टीएमसी पाणीइंदापूरला देण्यासाठीचा निर्णय रद्द करण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. वडापुरी येथील इंदापूर- बावडा रस्त्यावर शेतकर्यांनी सकाळी पूणे जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबीले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. तालुक्याला पाणी देण्यासाठीच्या रद्द केलेल्या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा अशी मागणी तांबीले यांनी केली. अन्यथा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी जेष्ठ नेते हणुमंतराव जगताप, सतीश पांढरे, हनुमंत जगताप, शिवाजी तंरगे, यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
मागील कित्येक वर्षांपासून आमच्या पूर्वजांनी २२ गावच्या पाण्यासाठी संघर्ष केला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरकरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी तो प्रयत्न कुरघोड्या करत हाणून पाडला. इंदापूर तालुक्यातील अनेक गावे उजनीच्या पाण्यात गेली असून हजारो हेक्टर जमीनी त्यासाठी दिल्या आहेत. उजनीच्या पाण्यावर इंदापूरकरांचा हक्क असताना त्यासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पाणी मिळाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे तांबीले यांनी सांगितले आहे.