पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

By admin | Published: September 9, 2016 01:50 AM2016-09-09T01:50:59+5:302016-09-09T01:50:59+5:30

यावर्षी पुणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. धरणं ओव्हरफूल झाली मात्र पश्चिम भागात. पूर्व भागातील बारामती, इंदापूर, पुरंदर व दौैंड या तालुक्यात मात्र पावसाने म्हणावी

Farmers aggressive to water | पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

Next

यावर्षी पुणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. धरणं ओव्हरफूल झाली मात्र पश्चिम भागात. पूर्व भागातील बारामती, इंदापूर, पुरंदर व दौैंड या तालुक्यात मात्र पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने या परिसरातील शेतीला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. काही भागात पिकं धोक्यात आल्याने निरा डावा कालवा, पुरंदर उपसा व जनाई शिरसाई या योजनेतून पाण्याची मागणी वाढली आहे. शेतकरी आक्रमक होत असून गुरूवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांना ठिय्या मारला.


पाटबंधारे कार्यालयासमोर मारला ठिय्या
भवानीनगर : नीरा डावा कालव्याचे पाणी मिळण्यासाठी गुरुवारी (दि. ८) सणसरसह ११ गावांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी सणसर पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. पाटबंधारे बारामती विभागाचे उपअभियंता ए. आर. भोसले यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. या वेळी शेतकऱ्यांनी भोसले यांना पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन दिले. १५ सप्टेंबरपर्यंत पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
नीरा डावा कालव्याच्या ३६ क्रमांकाच्या वितरिकेवर चिखली, कुरवली, जांब, मानकरवाडी, उद्धट, तावशी, पवारवाडी, उदमाईवाडी, हिंगणेवाडी, सपकळवाडी, सणसर या ११ गावांमधील शेती अवलंबून आहे. पावसाने पाठ फिरविली आहे. उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने येथील शेतकऱ्यांनी पिके जपली आहेत. नीरा डावा कालव्याच्या पाण्यावरच येथील शेती अवलंबून आहे. मात्र, कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेती अडचणीत आली आहे. शेतीपिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या.
या वेळी येथील शेतकरी आणि संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष तानाजी थोरात म्हणाले, की परिसरातील शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीत उन्हाळा पार केला. सध्या या भागांमधील विहिरींची पाणीपातळी घटली आहे. ५ ते १० मिनिटे विद्युतपंप सुरू राहतो. त्यामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होते. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. कालवा समितीच्या बैठकीत टेल टू हेड पाणी नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार इंदापूर आणि बारामतीला पाणी मिळाले; मात्र केवळ ३६ वितरिकेवरील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही.या वेळी मारुतराव वणवे, लालासाहेब सपकळ, शिवाजीराव रूपनवर, दिलीप पांढरे, रवींद्र कदम, दिलीप निंबाळकर, एल. पी. भोईटे, अमर कदम, सुभाष चव्हाण, प्रमोद थोरात आदी उपस्थित होते. ( वार्ताहर )

जनाई उपसाच्या पाण्याची प्रतीक्षा
वासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत भागातील नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अद्यापही टंचाई भासत असून, या भागात वर्षभरापासून सुरू असलेले पाण्याचे टँकर सुरूच आहेत. या भागातील जनता जनाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.
वासुंदे, हिंगणीगाडा, जिरेगाव, रोटी, कुसेगाव, पडवी, पांढरेवाडी ही गावे पुरेशा पावसाअभावी सतत दुष्काळाच्या छायेत येत आहेत. या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या तर सोडाच, परंतु पिण्याच्या पाण्याची कायमच टंचाई जाणवत असल्याने सततच्या दुष्काळाने बळीराजा पुरता हतबल झाला आहे.
अनेक गावांना आजही शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. तर, वासुंदे गावासाठी (दि.४) रोजी सुरू झालेला टँकर वर्षभरापासून बंदच झालेला नसून येथील जनता पाण्यासाठी आजही टँकरवर अवलंबून आहे.
सततच्या दुष्काळामुळे जमिनीतील पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने पाण्याचे सर्व स्रोत ऐन पावसाळ्यातही कोरडे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा व पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी या भागातील तलाव व बंधाऱ्यांमधून जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडल्यास पाणीटंचाई कमी होऊन जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने या भागातील जनता जनाईच्या पाण्याची आतुरतेने वाट
पाहत आहे. ( वार्ताहर )

Web Title: Farmers aggressive to water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.