पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By admin | Published: May 6, 2017 01:53 AM2017-05-06T01:53:59+5:302017-05-06T01:53:59+5:30

पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचा लाभ

Farmers' agitation for Purandar Bay water | पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचा लाभ पाईपलाईनद्वारे अनेक शेतकरी घेत आहेत. हा लाभ फक्त जवळील शेतकऱ्यांनाच होत आहे. या योजनेपासून लांब असलेल्या गावांतील शेतकऱ्यांचीही या योजनेतून पाणी मिळविण्यासाठी धडपड सुरू असून, लाखो रुपये खर्चून पाईपलाईनद्वारे शेतापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
पुरंदर तालुक्याला दुष्काळी स्थितीत पुरंदर उपसा जलसिंचन योजना वरदान ठरली आहे. तशी ही योजना कमी पाण्यावर जास्त क्षेत्र ओलिताखाली यावे म्हणून ठिबक सिंचन पद्धतीने तयार करण्यात आली. पाईपलाईनद्वारे दोन्हीकडील क्षेत्र पाण्याने भिजावे म्हणून या योजनेची पाईपलाईन डोंगराच्या कडेला न टाकता डोंगररांगांपासून काही अंतर सोडून करण्यात आली.
कोणतीही पाणी सोसायटी न करता पाणी सोडून तळी, बंधारे भरण्यात येत आहेत. उताराकडील जमिनींना या योजनेचे पाणी सहज मिळते; मात्र डोंगररांगांच्या जवळील जमिनी आजही या पाण्यापासून वंचित आहेत.
पुण्यातील रोजचे वापरात येणारे पाणी मुळा-मुठा नदीद्वारे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मिळते. पुण्याची लोकसंख्या पाहता हे पाणी उन्हाळ्यातही मुबलक प्रमाणात मिळते. ही योजना सुरू झाल्यानंतर पुरंदर तालुक्यात शिंदवणे घाट चढून तालुक्यात येते.
घाटुळीआई देवीनजीक योजनेचे पाणी डोंगराशेजारी सोडण्यात येते. पिसर्वे गावानजीक योजनेची पहली ठिबक सिंचनाची सोसायटी करण्यात आली; मात्र तांत्रिक बाबीमुळे ती सुरू होऊ शकली नाही. यामुळे उर्वरित कामे पुरी न होता ही योजना आजतागायत पहिल्यासारखीच सुरू आहे. म्हणून प्रत्येक गावातील काही भागाला पाणी मिळाले, तर काही भाग या योजनेपासून वंचित राहिला. यामुळे या योजनेत ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली.
आपल्यालाही पुरंदर उपसाचे पाणी मिळावे, यासाठी योजनेच्या लाईनपासून दोन-तीन किलोमीटरवर असणारे नाले, तळी भरण्यासाठी सध्या शेतकरी एकत्र आले आहेत. स्वत: लोकवर्गणी करून बारा-पंधरा लाखांच्या पाईपलाईन करून मातीबांध भरत आहेत. यासाठी योजनेचे अधिकारी चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत. यामुळे योजनेपासून दूर आसणाऱ्यांनाही सध्या पाणी मिळत आहे.
स्वत: पाईपलाईनचा खर्च करून पाणी मिळत असल्याने दूरवरचे शेतकरीही सुखावले आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी स्वत: पैसे योजनेच्या लाईनपासून ज्या ठिकाणी योजना पोहोचली नाही, तेथे नेले आहे. पुरंदर उपसा योजनेमुळे येथील शेतकरी सधन झाला असून नवनवीन तंत्रज्ञान वापरून विविध पिके घेत आहेत. यामुळे उसाची पिकेही घेऊ लागला आहे.

योजनेला शाखा अभियंता नाही
पुरंदर उपसा जलसिंचन योजना जेव्हापासून सुरू झाली, तेव्हापासून या योजनेचे शाखा अभियंता म्हणून साहेबराव भोसले काम पाहत होते. त्यामुळे त्यांना या योजनेची अचूक माहिती असल्याने समसमान पाणीवाटप करताना अडचणी येत नाहीत. मात्र, सध्या साहेबराव भोसले सेवानिवृत्त झाल्याने या योजनेला शाखाअभियंता नाही. यामुळे या ठिकाणी अनुभवी शाखा अभियंत्याची गरज आहे.
पाण्याची कमतरता याचा मेळ बसवताना या योजनेच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते, हे नक्कीच.


पुरंदर उपसा योजनेच्या लाईनपासून अनेक शेतकऱ्यांनी पाणी योजना केल्या आहेत. यामुळे पुरंदर तालुक्यातील बराचसा भाग आज ओलिताखाली आला आहे. एकंदरीत, अनेक शेतकऱ्यांचा यात सहभाग असल्याने आज ही योजना व्यवस्थित सुरू आहे.
योजनेच्या सुरुवातीपासून अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे पैसे भरून ही योजना सुरळीत चालण्यासाठी सहकार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर ही योजना सुरू राहिली आहे, त्यांनाही वेळेवर पाणी मिळणे गरजेचे आहे.
या योजनेच्या पाईपलाईनजवळील शेतकऱ्यांना मिळणारे पाणी व स्वत: लाखो रुपये खर्चून दूरवरच्या शेतकऱ्यांना मिळणारे पाणी यामुळे पुरंदर तालुक्यातील लाभार्थी भागात पाण्याची पातळी नक्कीच वाढली आहे.

Web Title: Farmers' agitation for Purandar Bay water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.