'जमीन आमच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची' अशा घोषणा देत आळेफाटा येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 05:37 PM2021-08-02T17:37:03+5:302021-08-02T17:38:05+5:30
पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी एक इंच सुद्धा जमीन नाही देणार; शेतकऱ्यांचा कडक इशारा
पुणे: 'रेल्वे हटवा शेतकरी वाचवा' व 'जमीन आमच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची' अशा घोषणा देत आणि पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाला कडाडून विरोध करत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकल्पासाठी इंचभरही जमीन देणार नाही. असे सांगून सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
रेल्वे विरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने अध्यक्ष निलेश भुजबळ, पाटील बुवा गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलनात जुन्नर आंबेगाव खेड व पुर्व हवेली या तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यामध्ये महिला शेतकरीवर्गाची लक्षणीय उपस्थिती होती. आळे येथून शेतकरी हातात काळे झेंडे व फलक घेऊन चालत आळेफाटा चौकात आले. यानंतर चौकातील शिवाजी महाराजांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरवात झाली.
'रेल्वे हटवा शेतकरी वाचवा' व 'जमीन आमच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची' अशा घोषणा शेतक-यांना सुरवातीलाच दिल्या. पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी ई प्रणालीने सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर प्रशासनाने या प्रकल्पासाठी जमीन मोजणीस सुरवात केली मात्र प्रशासनाने शेकक-यांना विश्वासात न घेता व याबाबत स्पष्टता न केल्याने शेतकरीवर्गाचा या प्रकल्पासाठी विरोध तीव्र झाला.
दरम्यान रास्ता रोको आंदोलन वेळी रेल्वे विरोधी संघर्ष कृती समितीचे निलेश भुजबळ पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे पाटील बुवा गवारी यांनी हा प्रकल्प रद्द करावा. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे सांगत भविष्यात यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.