आंबेगावचा शेतकरी आर्थिक अडचणीत, उभ्या पिकात सोडल्या शेळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 02:19 AM2018-05-27T02:19:31+5:302018-05-27T02:19:31+5:30
आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी टोमॅटो पिकाची लागवड झालेली आहे; परंतु टोमॅटो पिकासाठी झालेला खर्चही सुटत नसल्याने परिसरातील शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात शेळ्या व मेंढ्या सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अवसरी - आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी टोमॅटो पिकाची लागवड झालेली आहे; परंतु टोमॅटो पिकासाठी झालेला खर्चही सुटत नसल्याने परिसरातील शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात शेळ्या व मेंढ्या सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकºयांनी पिकविलेल्या कोणत्याच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून घोड नदी व डिंभे उजवा कालवा बारमाही पाण्याने वाहत असल्याने अवसरी, निरगुडसर, पारगाव, लाखणगाव, गावडेवाडी, मेंगडेवाडी आदी गावांतील शेतकरी नगदी पैसे मिळवून देणारी पिके घेत असतात.
तालुक्याला २५ ते ३० वर्षांपासून उन्हाळा टोमॅटो पिकाची लागवड करीत असतात.
पूर्वी आंबेगाव तालुक्यात शेतकºयांच्या बांधावर येऊन पंजाब, दिल्ली येथील टोमॅटो व्यापारी टोमॅटो खरेदी करीत असत. त्या वेळी टोमॅटोच्या २० किलो वजनाच्या पेटीला एक हजार ते बाराशे रुपये इतका बाजारभाव मिळत असे; परंतु सात ते आठ वर्षांपासून नारायणगाव येथे कृषी उत्पन्न बाजर समितीच्या जागेत टोमॅटो खरेदी-विक्रीचे व्यवहार चालु झाले तेव्हापासून दिल्ली व पंजाब येथील टोमॅटो व्यापारी आंबेगाव तालुक्यात येण्याचे बंद झाले.
-तालुक्यातील शेतकरी फेबु्रवारीत टोमॅटोरोपांची लागवड करतात व एप्रिल व मे महिन्यात टोमॅटो विक्रीसाठी तयार होतात. तालुक्यातील अवसरी, निरगुडस, पारगाव, गावडेवाडी, मेंगडेवाडी, शिंगवे आदी गावांतील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे. परंतु, शेतकºयांनी केलेला खर्च वसूल होत नसल्याने टोमॅटोपिकात मेंढ्या सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
- सध्या नारायणगाव येथे २० किलो वजनाच्या कॅरेटला १०० रुपये इतका कमी बाजारभाव मिळत असल्याने वाहतूक, टोमॅटो तोडणीचा खर्चही सुटत नसल्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या सोडण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे टोमॅटो बागायत शेतकरी सांगत आहे.