शेतमजूर ते द्राक्षबागायतदार यशस्वी वाटचाल
By Admin | Published: December 26, 2016 02:12 AM2016-12-26T02:12:09+5:302016-12-26T02:12:09+5:30
इंदापूर तालुक्यातील द्राक्षाचे आगार म्हणून बोरी गावाची ओळख आहे. मागील १० ते १५ वर्षांपूर्वी पाण्यासाठी दाहीदिशा असणाऱ्या
अजय नागवे / काझड
इंदापूर तालुक्यातील द्राक्षाचे आगार म्हणून बोरी गावाची ओळख आहे. मागील १० ते १५ वर्षांपूर्वी पाण्यासाठी दाहीदिशा असणाऱ्या या गावाचा शेततळ्यांच्या माध्यमातून आता कायापालट झाला आहे. शेतमजूर ते द्राक्षबागायतदार असा प्रेरणादायी प्रवास बोरीच्या शेतकऱ्यांचा आहे. तब्बल १५० शेततळी आहेत. या १५० शेततळ्यांत लाखो लिटर पाणी साठवले जात आहे. त्यामुळे दुष्काळातही येथील शेती हिरवीगार दिसते.
गावाची लोकसंख्या ६ हजारापर्र्यंत आहे. शेततळ्यात साठवलेल्या पाण्यामुळे गाव हिरवेगार आहे. १९७१-७२च्या काळात बोरी गावाला मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत तसेच २००४च्या काळत भीषण दुष्काळ पडला होता. या वेळी थोड्याफार प्रमाणात असणाऱ्या द्राक्षबागा पाणी नसल्यान तोडून टाकाव्या लागल्या आणि त्या वेळी गावातील बागायतदारांना आसपासच्या गावांमध्ये मजुरीसाठी जावे लागले. यानंतर मात्र गावातील प्रत्येक शेतकऱ्याने पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा चंगच बांधला. येथील शेतकऱ्यांच्या प्रयत्नातूनच बोरीच्या माळरानावर आज नंदनवन फुलले आहे. गावात बांधण्यात आलेल्या शेततळ्याचा वापर उन्हाळ्यात केला जातो. उन्हाळ्यात वापरलेल्या पाण्याचा साठा खालावला, की शेततळे पुन्हा भरण्यासाठी पावसाळ्यात विहिरी पाण्याने पूर्ण क्षमतेने भरून ठेवतात. शेततळ्यातले पाणी द्राक्ष बागांना ठिबक सिंचनाद्वारे दिले जाते. त्यामळे त्या पाण्याचीसुध्दा बचत होते. ज्या माळरानावर हुलगा, मटकी पिकत होते, तिथे आता फळबागा पिकत आहेत.
पहिल्यांदा विरोध; नंतर अनुकरण...
बोरी गावातील रामचंद्र शिंदे यांनी प्रथम बोरीमध्ये शेततळे उभारले. या वेळी त्यांना शेततळे न बांधण्याचा सल्ला अनेकांनी दिला. परंतु शिंदे यांनी शेततळे उभारून त्याचा वापरही शेतकऱ्यांना करून दाखवला. तसेच पाणीटंचाईच्या काळात याच शेततळ्याने त्यांच्या द्राक्षबागेला आधार दिला. यावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याकडून शेततळ्याची माहिती घेतली. येथूनच शेततळ्याची क्रांती होत गेली.