शून्य टक्के पीक कर्ज सवलतीचा शेतकऱ्यांना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:54+5:302021-07-12T04:07:54+5:30
राजगुरूनगर : खेड तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १८ शाखांतून २९ हजार ६१६ शेतकऱ्यांना खरीप हंगामात १६३ कोटी ...
राजगुरूनगर : खेड तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १८ शाखांतून २९ हजार ६१६ शेतकऱ्यांना खरीप हंगामात १६३ कोटी ६९ लाख २० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. गेली दोन वर्षे कोरोना काळात शेतकरी आर्थिक संकटात असताना बँकेने ३० जूनपर्यंत खरीप हंगामात थकीत शेतक-यांना शून्य टक्क्याने घेतलेले पीक कर्ज भरण्याची सवलत दिली होती. या सवलतीचा शेतक-यांना फायदा झाला असल्याची माहिती बँकेचे संचालक आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.
गेल्या मार्चनंतर २०२० सालात बँकेने २६९ कोटी ६४ लाख ३१ हजार रुपयांचे खरिपातील पीककर्ज वाटप केले होते. खरिपाचे पीककर्ज भरणा केला तर शून्य टक्के व्याज सवलत मिळून घेतलेले पीककर्जाची मुद्दल भरावी लागत असते. मार्च २०२१ मध्ये २३० कोटी ४० लाख १० हजार रुपये जमा झाले होते. ८५.४५ टक्के पीक कर्जाची परतफेड झाली. गेल्या वर्षभर कोरोनामुळे सर्वजण अर्थिक अडचणीत आल्याने याचा परिणाम शेतीक्षेत्रावर मोठा होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणारा शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. खरीप हंगामातील ३९ कोटी २४ लाख २१ हजार कर्ज थकीत येणे होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत पीक कर्जदारांना शून्य टक्के व्याजाने पीककर्ज भरणा करण्यासाठी ३० जूनपर्यंत संधी दिली. या संधीचा फायदा घेत शेतक-यांनी तब्बल २२ कोटी ५१ लाख ७ हजार कर्ज भरणा करत परतफेड केली. तर १६ कोटी ७३ लाख १४ हजार खरिपाचे कर्ज थकीत राहिले, अशी माहिती बँकेचे विभागीय अधिकारी विलासराव भास्कर यांनी दिली.
तर गेल्या रब्बी हंगामात बँकेच्या विविध शाखांमधून १४ हजार ६५९ सोसायटी शेतकरी सभासदांना ५७ कोटी ३३ लाख ४८ हजार रुपयाचे पीककर्जाचे वाटप करण्यात आले होते. ३० सप्टेंबरपर्यंत शेतक-यांना पीककर्ज जमा करण्याची मुदत असते.