दौंडच्या कानगांवात महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन; ऊर्जामंत्र्यांचा पुतळा जाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 05:14 PM2021-08-26T17:14:53+5:302021-08-26T17:15:00+5:30
शेतीचे विज कनेक्शन तोडणाऱ्या महावितरण कंपनीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची कानगांव येथून सुरुवात करण्यात आली.
पाटस : दौंड तालुक्यातील कानगाव येथे महावितरण कंपनीच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करुन यावेळी ऊर्जामंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. शेतीचे विज कनेक्शन तोडणाऱ्या महावितरण कंपनीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची कानगांव येथून सुरुवात करण्यात आली.
कोरोना महामारी, चक्रीवादळ, आस्मानी, सुलतानी संकट व लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला योग्य तो बाजार भाव मिळाला नाही. परिणामी शेतकरी व शेती व्यवसाय आर्थिक तोट्यात गेला. तरी देशाला अन्नधान्य, दूध,फळे-फुले पुरवण्याचे महान काम समस्त शेतकऱ्यांनी केले आहे. संपुर्ण जग व कंपन्या उद्योग धंदे कोरोना महामारी मध्ये बंद पडले. पण शेतकऱ्यांनी आपला शेती व्यवसाय बंद पडू दिला नाही.
परंतु महावितरण कंपनी मुळे आज कानगाव सहित राज्यभर अनेक शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. या सर्व समस्यांशी शेतकरी लढत असताना महावितरण कंपनीने शेतीला पाणीपुरवठा करणारे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडून बेकायदेशीर वीज पुरवठा खंडित करून शेती व्यवसाय बंद पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळून गेलीआहेत तर काही पिकांच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनी व संबंधित व्यवस्थेचा आज कानगाव येथील ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला. तसेच शासन प्रशासन व महावितरण कंपनीचे या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी ऊर्जा मंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
विद्युत विज वितरण कंपनीने त्वरित वीज पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा. यासाठी 'सुरू करा सुरू करा खंडीत विज पुरवठा सुरू करा, महावितरण कंपनीचा निषेध असो शेतकरी एक जुटीचा विजय असो' या घोषणा आंदोलकांनी दिल्या. खंडीत विज पुरवठा सुरू न केल्यास २६ ऑगस्ट २०२१ पासून बेमुदत बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माऊली शेळके, भीमा पाटसचे माजी संचालक महादेव चौधरी, कानगांवचे सरपंच राहुल चाबुकस्वार असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते