आग लागल्याने शेतकऱ्याचा गोठा जळाला; खेड तालुक्यातील घटना, २ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 04:17 PM2018-02-26T16:17:01+5:302018-02-26T16:17:01+5:30
अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. खेड तालुक्यातील कोहिंडे येथील रौधळवाडी येथे रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत यांचे २ लाख हजार रुपयांचे नुकसान झाले.
चासकमान : अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. खेड तालुक्यातील कोहिंडे येथील रौधळवाडी येथे रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत यांचे २ लाख हजार रुपयांचे नुकसान झाले.
मल्हारी बाजीराव रौधळ (वय ४५) असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. रौधळ यांनी गोठ्यामध्ये जनावरे बांधलेली होती. यासोबतच कडबा, सुका चाराही ठेवलेला होता. संध्याकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये गोठ्यात बांधलेली जनावरे गंभीररित्या भाजली. तर कडबा आणि सुका चाराही जळून खाक झाला. जनावरांना वाचविण्याची धडपड करीत असताना रौधळ यांनाही आगीच्या झळा बसल्या. आगीची घटना समजताच ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. एका बैलाचा मृत्यू झाला असून गाय आणि आणखी एक बैल ८० टक्के भाजला आहे.
घटनेचा पंचनामा तलाठी शेख, पोलीस पाटील अरुण पवार, कोतवाल उत्तम कुडेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पोखरकर यांच्या पथकाने केला. यावेळी माजी सरपंच संजय रौंधळ, उपसरपंच सत्यवान पानमंद, माजी उपसरपंच अजित कुटे, बाळासाहेब पिंगळे, मारुती रौंधळ, साहेबराव जाधव उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी भेट देऊन लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनी रौंधळ यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी मदत गोळा केली असून ही मदत अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी देण्यात येणार आहे.