शेतकऱ्यांची पोरं आत्महत्या करतायेत अन् राज्यमंत्री पार्ट्यांवर ताव मारतायेत; हर्षवर्धन पाटलांची भरणेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 05:22 PM2022-03-08T17:22:34+5:302022-03-08T17:22:47+5:30
पुणे सोलापूर महामार्गावर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
इंदापूर : पुणे सोलापूर महामार्गावर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात हजारोच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. विज वितरण विभागाने तात्काळ विज जोडणी करावी अन्यथा रस्त्यावरून बाजुला न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. यावेळी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे. राज्यात शेतकर्यांची पोर आत्महत्या करत असताना राज्यमंत्री घोड्यावर, रथातुन मिरवणुक काढुन पार्ट्यांवर ताव मारत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली इंदापूर बाह्यवळण, मालोजीराजे भोसले चौक येथील सोलापूर- पूणे हायवे महामार्गावर विद्युत वितरण विभागाच्या विज तोडणी मनमानी कारभाराविरोधात भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, शासनाने आजच आदेश द्यावा व लाईट तात्काळ चालु करावी, मार्च - एप्रिल - मे असे तीन महिने लाईट न घालवता थकीत बीलाचे चार हप्ते करून ते ठरलेल्या नियमाप्रमाणे स्विकारावेत, वीज तात्काळ जोडावी व १० तास वीज द्यावी, तालुक्यात ट्रान्सफर मागणी पेंडीग आहे ते ट्रान्सफर तात्काळ मंजुर करून कार्यान्वित व्हावेत अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. तर राज्यात शेतकर्यांची पोर आत्महत्या करत असताना राज्यमंत्री घोड्यावर, रथातुन मिरवणुक काढून पार्ट्यांवर ताव मारत फिरत असल्याची टीका पाटलांनी केली आहे.
आंदोलकांनी पूणे- सोलापूर हायवे रस्ता रोखून तब्बल साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने वाहन चालक व प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी चर्चा केली. व फडणविस यांनी आंदोलकांना मार्गदर्शक सुचना दिल्यानंतर दुपारी २:३० वाजता आंदोलन स्थगित केल्याचे जाहिर केले.